नवी मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावी यासाठी नवी मुंबई शहरात सिडकोने सोडत काढली होती. परंतु या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा झाल्याने आता सोडतधारक निराश झाले आहेत. घरांच्या वाढलेल्या किमतीविरोधात नवी मुंबईत मनसेच्या नेतृत्त्वाखाली सोडतधारकांनी साखळी आंदोलन केले. सिडकोच्या घरांचे दर कमी नाही झाले तर पुढील आठवड्यात मनसेचा इंजेक्शन मोर्चा निघेल असा इशारा मनसेचे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांचा सिडकोला इशारा दिला. सिडकोने ७०० कोटी खर्च करून ज्या मार्केटिंग कंपनीशी करार केला होता ते पैसे घरांच्या किंमती कमी करण्यासाठी वापरले असते तर गोर गरिबांचे आशीर्वाद मिळाले असते अशी भावना काही सिडको सोडतधारकांनी व्यक्त केली.

हक्काचे आणि परवडणारे घरे मिळावी यासाठी सर्वसामान्य नागरिक सिडको आणि म्हाडाच्या सोडतीची प्रतिक्षा करत असतो. मुंबई आणि ठाणे शहरापासून जवळ असलेल्या आणि सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईत घर मिळावे यासाठी हजारो नागरिक सिडकोच्या सोडतीवर अवलंबून असतात. ऑक्टोबर २०२४ मध्ये सिडकोने नवी मुंबई परिसरात २६ हजार घरांची सोडत जाहीर केली होती. परंतु या सोडतीत घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा होत्या. त्यामुळे सोडत विषयी सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सिडकोच्या घरांची किंमत कमी व्हावी यासाठी आता मनसेने आंदोलन सुरु केले आहे. मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी वाशी येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने सिडको सोडतधारक मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी सिडकोच्या प्रतिमेस लोखंडी साखळदंडाने बांधून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नर असा पायी मोर्चा काढण्यात आला. अरेंजा कॉर्नर येथे सिडको सोडतधारकांनी भव्य मानवी साखळी उभी करून सिडको चा निषेध केला.

‘कमी करा कमी करा, सिडकोच्या घरांची किंमत कमी करा’, ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, जाहिरात केली दुनियाभर’, ‘तुम्ही म्हणता नवी मुंबईचे प्रवेशद्वार, किंमत पाहून झाले सर्व गपगार’, ‘स्वस्त घरांची दाखवली आशा, किंमती वाढवून केली निराशा’, अशा घोषणांचे फलक हातामध्ये धरत महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक भर उन्हात आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

सिडकोने दर जाहीर करण्यापूर्वी १ लाख ५२ हजार अर्ज आले असताना दर जाहीर झाल्यानंतर फक्त २२ हजार अर्ज उरले. त्यातील जवळपास सहा ते सात हजार सोडतधारकांना घरे जबरदस्ती माथी मारली आहेत. सिडकोने ७०० कोटी खर्च करून ज्या मार्केटिंग कंपनीशी करार केला होता ते पैसे घरांच्या किंमती कमी करण्यासाठी वापरले असते तर गोर गरिबांचे आशीर्वाद मिळाले असते अशी भावना काही सिडको सोडतधारकांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकी पूर्वी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी आश्वासन दिले होते की घरांच्या किंमती २० ते २५ टक्क्यांनी कमी होतील. या घोषणेची मंत्र्यांना विसर पडल्याचे दिसते.

कुर्ला मध्ये म्हाडा जवळपास ५०० चौ फुटाचे घर ५० लाख रुपयांना देत असताना सिडको नवी मुंबईत ३०० चौ. फुटाचे घर ८० लाख रुपयांना का देत आहे ? असा सवाल उपस्थित करत ही सर्व सामान्यांची घोर फसवणूक आहे असा आरोप गजानन काळे यांनी सिडको प्रशासनावर केला. पुढील निर्णय होई पर्यंत सिडकोने पैसे भरायची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी सुद्धा या आंदोलनावेळी गजानन काळे यांनी सिडको प्रशासनाला केली.