नवी मुंबई : ठाणे व नवी मुंबई शहरांमध्ये खाडीकिनारा तसेच पाणथळींचे प्रमाण अधिक असून एकीकडे पर्यावरणप्रेमी पाणथळ जागा संरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असताना दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेल्या पाणथळींकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. टीएस चाणक्य, डीपीएस तलाव व एनआरआय पाणथळ जागा संरक्षित करण्यासाठी प्रयत्न होत असताना सीवूड्स सेक्टर २७ येथील लोटस पाणथळ तलावाला ‘डेब्रिज’चा विळखा पडू लागला आहे. त्याबद्दल पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करत असून राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पाणथळ सर्वेक्षणात महाराष्ट्रात ५६४ पाणथळ जागांचा समावेश आहे.तर ठाणे जिल्ह्यात १९ पाणथळ जागांचा समावेश असून त्यात लोटस तलावाचा उल्लेख आहे. सीवूडस सेक्टर २७, येथील लोटस तलाव परिसरात डेब्रिज टाकले जात आहे. तलाव परिसरात छुप्या पद्धतीने हा राडारोडा टाकला जात आहे. तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणथळ जागा संरक्षित करण्यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्नशील असताना पालिका पाणथळ तलावाकडे दुर्लक्ष केले जाते.
हेही वाचा >>>रविवार आरोग्य सफरीचा पाम बीच मार्ग, दर रविवारी क्रीडाप्रेमींसाठी खुला करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने डेब्रिज टाकणाऱ्यांवर डेब्रिज भराराी पथकामार्फत कारवाई केली जाते. मात्र या पाणथळ तलावाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आहे. तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांनी या तलाव परिसराला भेट देऊन कार्यवाहीही केली होती. परंतु मागील काही दिवसांपासून प्लास्टिकच्या पोत्यात भरुन तलाव परिसरात डेब्रिज टाकले जात आहे. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
सीवूडस सेक्टर २७ कमळ जलाशयात डेब्रिज टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालिकेचे डेब्रिज भरारी पथक दुर्लक्ष करते. लोटस तलाव हा नवी मुंबईतील पाणथळ यादीत समाविष्ट असताना पालिका त्याकडे दुर्लक्ष करते. या तलावाच्या परिसरात टाकल्या जाणाऱ्या डेब्रिज तसेच अनधिकृत बांधकामांबाबत याचिका प्रलंबित आहे. पाणथळ जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. लोटस तलावाचेही पाणथळ तलाव म्हणून सर्वेक्षण करण्यात आले आहे. – प्रदीप पाटोळे, वकील, याचिकाकर्ते