नवी मुंबई : गुगल मॅप वर “write review on google map” द्या आणि प्रति रिव्ह्यू १५० रुपये कमवा असा संदेश सध्या अनेकांना येत आहे. कामोठे येथे राहणाऱ्या एका युवकाने भरपूर पैसे मिळतील या अपेक्षेने काम सुरु केले मात्र पैसे मिळवण्या ऐवजी त्या युवकाची ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून सायबर विभाग पुढील तपास करीत आहे.
कामोठे येथे राहणारे विश्वजित कोळेकर यांच्या मोबाईल वर ६ डिसेंबरला “write review on google map” असा संदेश आला त्यात प्रतिरिव्ह्यू १५० रुपये मिळतील असे नमूद करण्यात आले होते. तसेच एक गुगल लिंक देण्यात आली होती. ती लिंक उघड करून त्यात रिव्ह्यू लिहून स्क्रीन शॉट पाठवा असे सांगण्यात आले. तसेच स्क्रीन शॉट पाठवल्यावर कंपनीच्या स्वागतिका यांच्याशी टेलिग्राम वर संपर्क करण्यास सांगितले त्याची लिंकही देण्यात आली, त्याप्रमाणे विश्वजित यांनी रिव्ह्यू देत त्याचा स्क्रीन शॉट पाठवला व कंपनी स्वागतिकाशी संपर्क केला. काही वेळाने १५० रुपये ऑनलाईन विश्वजित याला मिळाले. ज्या खात्यातून हे पैसे आले त्यांचे नाव परी मिश्रा असे होते त्यांनी विश्वजित यांना अन्य एका समूहात भरती तसेच ठराविक रिव्ह्यू करण्याचे (टास्क) सांगण्यात आले. असे अनेक रिव्ह्यू दिल्यावर पैसे न आल्याने विश्वजित यांनी संपर्क केला असता प्रीपेड खाते उघडा त्वरित पैसे मिळत राहतील असे सांगण्यात आले.
आणखी वाचा-पनवेल : पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी ४ हजार पोलीसांचा बंदोबस्त
विविध कारणे देत मागणी केल्या प्रमाणे १० हजार ते ५० हजार असे ९ वेळा पैसे एकूण ३ लाख ६५ हजार रुपये पाठवण्यात आले. मात्र तरीही रिव्ह्यू चे पैसे देण्यात आले नाही तसेच भरलेले तरी पैसे द्या अशी मागणी केली असता संपर्क करणे बंद केले गेले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर विश्वजित यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, पोलिसांनीही तात्काळ कारवाई करीत ज्या खात्यातून पैसे भरले होते ते खाते गोठवले असून त्यात एक लाख रुपये आहेत.