नवी मुंबई : अर्थसंकल्पात अर्थशिस्तीचे धडे देत उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे मार्ग धुंडाळणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला वाशी येथील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या आलिशान अशा व्यापारी संकुलाचा भाडेकरार मात्र अजूनही करता आलेला नाही. देखभाल, दुरुस्तीच्या खर्चासह ३२ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत भाड्यापोटी जमा व्हावेत असे पालिकेचे गणित होते, पण ते प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेला जुन्या वाशी डेपोचा पुनर्विकास करताना महापालिकेने स्वखर्चातून याठिकाणी २१ मजली आलिशान इमारत उभारली आहे. नऊ हजार चौरस फुटांची कार्यालये, एकूण २८ हजार चौरस फुटांची दुकाने, १० हजार चौरस फुटांचे सहा उपहारगृहांची प्रशस्त व्यवस्था या इमारतीत आहे. वर्षाला देखभाल, दुरुस्तीच्या खर्चासह ३२ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत भाड्यापोटी जमा व्हावेत अशी गणितेही मांडली गेली आहेत. मात्र या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळून सहा महिने होत आले तरी भाडेकरु मिळविण्यात परिवहन प्रशासनाला यश आलेले नाही.
उत्पन्न वाढ, अर्थशिस्त यासाठी एकीकडे आयुक्त शिंदे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असले तरी महापालिकेनेच उभारलेली आलिशान अशी वाशीतील इमारत भाडेकरु अभावी धुळ खात पडून असल्याने यामुळे होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दुकाने, हाॅटेल, कार्यालये ओस

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची मालकी असलेला वाशी सेक्टर नऊ येथील डेपो हा शहरातील सर्वात मोक्याच्या ठिकाणी आहे. पार्किगच्या उभारणीसाठी महापालिकेने अलिकडे खासगी विकसकांचा शोध सुरू केला असला तरी २०१६ साली डेपोची ही जागा मात्र स्वत: उभारणीचा निर्णय घेतला. आवश्यक चटईक्षेत्राचा पुरेपूर वापर करत महापालिकेने स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करत शिवाजी चौकास लागून २१ मजल्यांचे व्यापारी संकुल उभारले. सहा महिन्यांपूर्वी या संकुलाच्या इमारतीस महापालिकेच्या नगररचना विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्रही मिळविण्यात आले. मात्र वाशीसारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीस भाडेकरु का मिळत नाही, याचे उत्तर मात्र परिवहन प्रशासनाला देता आलेले नाही.

अर्ध भोगवटाधारक मात्र जोरात

वाशी तसेच पाम बीच मार्गास लागून गेल्या काही काळात मोठ्या विकसकांनी उभारलेल्या व्यापारी संकुलांमधील गाळे मात्र लगेच भाड्याने कसे जातात याचे उत्तर मात्र महापालिकेकडे नाही. यापैकी अनेक इमारती पूर्णही झालेल्या नाहीत. काहींनी अर्ध भोगवटा (पार्ट ओसी) मिळवून दुकाने भाड्याने दिली आहेत. वाशी सेक्टर १७ येथील शहा बिल्डरने उभारलेली इमारत अर्धवट अवस्थेत उभी आहे. तेथील तळ मजल्यावरील दुकाने मात्र जोरात सुरू आहेत. वाशी पाच बीच मार्गालगत असलेल्या सतरा प्लाझा या व्यापारी संकुलालगत नव्याने उभ्या राहीलेल्या एका व्यापारी संकुलातही तळ माजल्यावरील हा भाडेकारभार जोरात सुरू आहे. असे असताना मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या संकुलाला भाडेकरु कसा मिळत नाही, हा सवाल मात्र कायम आहे.

३२ कोटींच्या केवळ गप्पाच

  • महापालिकेने डेपोच्या जागेवर उभारलेल्या या संकुलात तळ मजल्यावर ७ भली मोठी दुकाने आहेत. २७५०, ५४०८, ६२२२ चौरस फुटांचा आकार असलेल्या या दुकानांना चांगले भाडे मिळेल यात शंकाच नाही. याशिवाय ६७ चौरस फुटाची लहान किओस्कही उभारली आहेत.
  • १६४८ ते २४२२ चौरस फुटांचा आकार असलेल्या जागा हाॅटेलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सहाव्या ते २१ मजल्यापर्यत प्रत्येकी ९२६१ चौरस फुटाची जागा कार्यालयांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
  • या सर्व जागेचे वर्षाला ३२ कोटी रुपये भाडे मिळावे असे अपेक्षित धरण्यात आले आहे. नाईट फ्रॅक नावाच्या प्रतिथयश संस्थेने केलेल्या अभ्यासात महापालिकेला हा अहवाल दिला. त्यानुसार महापालिकेने निवादाही मागविल्या.
  • मात्र या प्रक्रियेनंतरही महापालिकेला भाडेकरु मिळत नसल्याने भोगवटा प्रमाणपत्र मिळून सज्ज असलेली हे आलिशान व्यापारी संकुल धुळ खात पडून आहे.

वाशी बस डेपोच्या जागेवर महापालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुलातून वर्षाला ३२ कोटी रुपयांचे उत्पन्न आम्ही अपेक्षित धरले आहे. यासंबंधीची निविदा प्रक्रिया यापूर्वी राबविण्यात आली आहे. मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. यासंबंधीची प्रक्रिया नव्याने सुुरू करुन महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल असाच प्रयत्न केला जात आहे. – डाॅ. कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महापालिका