प्रभाग वाटपावरून मतैक्य नाही; शिवसेनेची सर्व सूत्रे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे
नवी मुंबई : पालिकेच्या एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन करण्यावर तीनही राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची सहमती झाली आहे. मात्र प्रभाग वाटपाबाबत मतैक्य नसल्याचे शिवसेना आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. नवी मुंबई शिवसेनेत सध्या नाहटा व मोरे असे दोन्ही गट सक्रिय झाल्याने ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे या निवडणुकीची सर्व सूत्रे सोपविण्यात आल्याचे समजते.
नवी मुंबई पालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्यात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबई पालिकेत करण्यासाठी आतापर्यंत नऊ बैठका झालेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने माजी मंत्री शशिकांत शिंदे, तर शिवसेनेच्या बाजूने उपनेते विजय नाहटा या बैठकींचा किल्ला लढवत आहेत. काँग्रेसने स्थानिक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीचे सदस्य अनिल कौशिक आणि माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यावर प्रभाग वाटपाची जबाबदारी सोपविली आहे. मार्च महिन्याच्या शेवटी या प्रभाग वाटपात राज्य पातळीवरील पदाधिकारी भाग घेण्याची शक्यता आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांना या वेळी कात्रजचा घाट दाखविण्यासाठी तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून निवडणुकीच्या दरम्यान पक्षाच्या अनेक नेत्यांना नवी मुंबईत तळ ठोकण्याचे आदेश आहेत. प्रभाग वाटपात वेळप्रसंगी नमते घ्यावे लागले तरी चालेल; पण या वेळी नाईकांचा वारू रोखण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तीन पक्ष महाविकास आघाडी करण्यास तयार आहेत. मात्र शिवसेना पन्नास, राष्ट्रवादी चाळीस आणि काँग्रेस एकवीस ह्य़ा १११ प्रभागाच्या वाटपावर मात्र हे तीनही पक्षांचे एकमत नाही. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी हे प्रभाग वाटप शिवसेनेला मान्य नसून याबाबत केवळ पालकमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनीही ह्य़ा तुटपुंज्या जागांवर काँग्रेस नेते राजी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रभाग वाटपामध्ये तीन पक्षांचे एकमत नाही, हे स्पष्ट होत झाले आहे.
शिवसेना जागांसाठी आक्रमक
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा झालेला प्रयोग नवी मुंबईत यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे. खासदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेला ८४ हजार मतांचे मताधिक्य आहे. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने भाजपच्या दोन्ही उमेदवारांसाठी चांगले मताधिक्य दिले आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेत जास्तीत जास्त प्रभाग निवडून आणण्याचे शिवसेनेने लक्ष्य ठेवले असून १११ प्रभागांपैकी जास्त प्रभाग निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर या पक्षाची शहरातील ताकद कमी झाली असली तरी संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीलाही ४०हून अधिक जागा हव्या आहेत. एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईत काही नगरसेवक याच बळावर निवडून येत असल्याने ते या प्रभागातील दावा सोडणार नाहीत. त्यांचीही मागणी जास्त असल्याने केवळ तिकिटवाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर सत्तेसाठी ही महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे.