मालमत्ता कर अभय योजनेअंतर्गत वसुली; दुबार मालमत्ता कर देयकांची छाननी सुरू

नवी मुंबई : पालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांना दंडाच्या रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट देणारी अभय योजनेद्वारे आजवर ६० कोटी रुपयांची वसुली झाल्याची माहिती मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान एकाच मालमत्तेवर दुबार देयके पाठविण्यात आल्याने थकबाकी रकमेचा फुगवटा दोन हजार १०० कोटींवर गेला आहे. पालिका स्थापनेपासून दुबार देयकांचा घोळ सुरू असून याबाबत प्रथमच या देयकांची छाननी सुरू झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पालिकेच्या सर्व विभागांत आजवर एकूण तीन लाख १३ हजार ५५२ मालमत्ता देयके पाठविण्यात आली आहेत. यात एकाच मालमत्तेवर दोनदा देयके देण्यात आली आहेत. या देयकांची निश्चित आकडेवारी पालिकेकडे नाही.

मालमत्ताधारकांना दुबार देयके गेल्यानंतर त्याविषयीची तक्रार पालिकेला प्राप्त झाल्यानंतरच ही बाब निदर्शनास येते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन हजार ११३ कोटी रुपयांची थकीत रक्कम ही देयकांच्या घोळामुळेच आहे. छाननीनंतर कदाचित या रकमेत घट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मालमत्ता कर विभागाद्वारे सर्वेक्षण करून त्याची विदा (डाटा) एकत्र जमा करण्यात आली आहे, परंतु रहिवाशी व औद्योगिक क्षेत्रातील अनेक देयके एकाच मालमत्तेवर एकापेक्षा अधिक वेळा निघत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मालमत्ता कराच्या आकारणीबाबतही अनेक प्रकरणात शंका घेतली जात आहे. याबाबतचे अनेक वाद प्रलंबित आहेत. मोकळ्या मैदानावरही मालमत्ता कर आकारणीवरून वाद झाले आहेत. पालिकेच्या स्थापनेपासून मालमत्ता करांच्या बिलांच्या घोळामुळे थकीत रकमेचा फुगवटा मात्र वर्षांनुवर्ष वाढत आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकातही मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट दरवर्षी वाढत असताना मुळातच थकीत रकमेचा आणि एकाच मालमत्तेवर दिल्या गेलेल्या देयकांबाबत ठोस निर्णय करुन योग्य कार्यवाही करण्यास करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पालिकेच्या आठ विभाग कार्यालयाअंतर्गत दुबार मालमत्ता कर देयकांची छाननी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. छाननीबाबत कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.  – अमोल यादव, उपआयुक्त मालमत्ता कर विभाग

Story img Loader