|| पूनम धनावडे

स्वच्छ सर्वेक्षणात आघाडीवर राहण्याच्या नवी मुंबई पालिकेच्या निर्धारात बाधा? :-यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नवी मुंबई महापालिकेला देशातील पहिल्या तीन शहरांमध्ये आणण्याचा निर्धार पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी बोलून दाखवला आहे. मात्र महापे औद्योगिक क्षेत्राला पडलेला समस्यांचा विळखा पालिकेच्या या निर्धाराच्या आड येण्याची शक्यता आहे. सध्या महापे औद्योगिक परिसरातील रस्त्यांवर खड्डे, रस्त्याकडेला प्लास्टिकचा खच आणि मोकळ्या भूखंडावर बेकायदा झोपडय़ा उभारल्या गेल्या आहेत. तर या क्षेत्रातील नाल्यांची पावसाळ्यानंतरची सफाई अद्याप झालेली नाही.

महापे औद्योगिक   वसाहतीत चांगल्या रस्त्यांची वानवा आहे. त्यामुळे विविध भागांतून येणाऱ्या नोकरदारांचा प्रवास खडतर ठरत आहे. गेल्या पावसाळ्यात पडलेल्या खड्डय़ांनी आता मोठे रूप धारण केले आहे. याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वसाहतीतील ‘ए ब्लॉक’मध्ये सध्या घाणीचे साम्राज्य आहे. येथील रस्त्यावर प्लास्टिकच्या कचऱ्याचे  ढीग साचले आहेत. येथील अनेक उघडे नाले तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे सर्वत्र दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. एमआयडीसीच्या वतीने पालिकेला एमआयडीसीकडून मालमत्ता कराच्या रूपाने ७०० रुपये उपलब्ध होत असतात. त्यामुळे या भागातील स्वच्छतेची जबाबदारी पालिकेचीही आहे.

 

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

महापे एमआयडीसीतील रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत महापे एमआयडीसी उपअभियंता यशवंत मेश्राम यांना विचारले असता, तुम्ही आमच्या कार्यालयात येऊन येथील खड्डे दाखवा असे उत्तर देण्यात आले तर कार्यकारी अभियंता कलगुटगी यांना विचारले असता  २००४ मध्येच नवी मुंबई महापालिकेला रस्ते, पथदिवे यांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. असे सांगण्यात आले.

अनधिकृत झोपडय़ा

महापे एमआयडीसीत असलेल्या मोकळ्या जागांवर जागोजागी बेकायदा झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. स्थानिकांच्या आशीर्वादाने या झोपडय़ा उभ्या राहात आहेत. त्यावर एमआयडीसी वा पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मार्च २०१७  मध्ये महापे एमआयडीसीतील झोपडय़ांवर मोठय़ा प्रमाणावर  कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत जवळपास १७०० ते १८०० झोपडय़ांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती .

.महापे एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. यात त्यांना रस्त्यांची दुरुस्ती, गटारांची दुरुस्ती, स्वच्छता करण्यासबंधी सांगितले आहे. -अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Story img Loader