उरण : १ मे हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा व जगातील कामगारांच्या हक्काचा व विजयाचा दिवस आहे. हा मे दिन उरण मध्ये अभिवादन,मिरवणुका आणि सभा घेऊन परंपरेने उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये शासकीय कार्यालयावर ध्वजारोहण ही करण्यात आले. उरण हा औद्योगिक तालुका आहे. त्यामुळे १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन संयुक्त पणे साजरा केला जातो. तब्बल चार दशकापासून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स( सी आय टी यु )या लाल बावट्याच्या कामगार संघटनेच्या वतीने कामगारांची मिरवणूक काढून सभा घेतली जाते. तीही उरण शहरातील गांधी चौकात होते. याही वर्षी उरणच्या चारफाटा येथून हातात लाल झेंडे घेऊन उरण शहरातील लाल मैदान,खिडकोळी नाका,गणपती चौक,गांधी पुतळा, बाजारपेठ, जरीमरी मंदीर ते गांधी चौक अशी मिरवणूक काढण्यात आली.
हेही वाचा >>> महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कौल आळी, घणसोली येथे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ कार्यान्वित
मिरवणुकीत कामगारांच्या एकजुटीचा विजय असो,केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहिता मागे घ्या,बेरोजगारांना काम द्या,प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करा,त्यांची राहती घरे नियमित करा,महागाई कमी करा,विनाशकारी प्रकल्प रद्द करा,शेतकरी व महिलांवरील दडपशाही थांबवा आदी मागण्यांची जोरदार घोषणाबाजी करीत ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी नंतर गांधी चौकात सभा घेण्यात आली. या सभेत जेएनपीटी चे माजी कामगार विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील,सी आय टी यु चे रायगड जिल्हा अध्यक्ष कॉ. मधुसूदन म्हात्रे, शशी यादव,संदीप पाटील,किसान सभेचे संजय ठाकूर, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील,अमिता ठाकूर,दिनेश म्हात्रे,आदींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार,शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील धोरणांवर सडकून टीका केली. आणि या सरकारा विरोधात कामगार,कष्टकरी, शेतकरी, महिला,युवक,ल व विद्यार्थ्यांना तीव्र संघर्ष करण्याचे आवाहन केले.