नवी मुंबई : खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यातील उष्माघाताच्या बळींची संख्या आता चौदावर गेली आहे. रखरखत्या उन्हामुळे काल शेकडो श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला होता. त्यापैकी ११ जणांचा रविवारी तर दोन जणांचा सोमवारी आणि आज एकाचा मृत्यू झाला आहे.
खारघर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यभरातून लाखो श्रीसदस्य उपस्थित राहिले होते. तापमान थेट ३९/४० डिग्रीपर्यंत वाढल्यामुळे शेकडो श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. अनेक जणांवर मैदानात उभारलेल्या आमराई आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. काहींना गंभीर स्वरुपाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ११ श्रीसदस्यांचा रविवारीच मृत्यु झाला. सोमवारी पहाटे एमजीएम कामोठे रुग्णालयात उपचार सुरू असताना विरार येथील गुलाब पाटील आणि वाशी येथील महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विनायक हळदणकर यांचे निधन झाले. मृद श्रीसदस्यांमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. सध्या वाशी एमजीएममध्ये ३, कामोठे एमजीएममध्ये ६, भारती रुग्णालयात १ आणि वाशी येथील महापालिका रुग्णालयात १, असे एकूण ११ रुग्ण उपचार घेत आहेत. बाकी सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (मंगळवारी) वाशीतील एम जी एम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या स्वाती वैद्य (वय ३४ राहणार विरार ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला . त्यांच्या मृत्यूने घटनेतील मृतांची संख्या १४ पर्यंत पोहचली आहे.