कोकण शिक्षक विधान परिषद मतदार संघाची निवडूक आज सोमवारी(ता.३०) ला संपन्न झाली.३७ हजार ७३१ मतदार असलेल्या या कोकण मतदार संघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ८ उमेदवार असलेल्या या मतदारसंघात खरी लढत शेकाप व महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील व भाजपचे व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे खरी लढत झाल्याचे बोलले जात आहे.परंतू याच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही हिरव्या पेनाच्या नावाने हिरव्या नोटांचे वाटप झाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : शिंदे गटाचे कुलकर्णी नाराज, सरकारवर जाहीर टीका
कोकणातील सिंधुदुर्ग ते या मतदारसंघातील अखेरचे टोक असलेल्या पालघरपर्यंतचा या मतदारसंघाचा विस्तार समाविष्ट होता. ३७ हजाराहून अधिक शिक्षक मतदार असलेल्या या मतदारसंघात यावेळी पैसे तसेच साड्या वाटपाचा बोलबाला झाला आहे.त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार हे २ फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीतच स्पष्ट होणार आहे.
राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असून त्यामध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सत्तासंघर्षापासून दूर राहीलच कशी असे चित्र होते. एकीकडे या मतदारसंघासाठी भाजपने व बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोर लावला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाळाराम पाटील यांनी दांडग्या जनसंपर्काच्या जोरामुळे या निवडणुकीत रंगत आली होती.
सोमवारी झालेल्या मतदानाच्या दोन दिवस आधीच पैसे वाटपाचा धुरळा उडाल्याची चर्चा मतदानाच्या दिवशी चांगलीच चर्चेला होती. मतदानाच्यावेळी जांभळ्या रंगाच्या पेनाने पसंतीक्रमांक लिहायचा होता.त्यामुळे मतदानाच्या दिवशी जांभळ्या रंगाच्या पेनाला महत्व होते. तर मतदानाच्या आधी दोन दिवस हिरव्या पेनांच्या नावाने हिरव्या नोटांचे वाटप झाल्याची चर्चा सुरु होती. तर एका उमेदवाराने २ हजार तर दुसऱ्या एका उमेदवाराने ५ हजार रुपयाच्या हिरव्या नोटाचे वाटप केल्याची चर्चा मतदानाच्या दिवशी रंगात आली होती. तर साड्यांचे वाटप झाल्याचाही बोलबाला सुरु होता. एकंदरीतच संत्ता संघर्षाच्या रणधुमाळीत शिक्षक मतदारसंघ मागे राहीला नसून या निवडणुकीतही पैसे वाटपाची चर्चा पाहायला मिळाली.त्यामुळे या निवडणुकीत नोटांचे वाटप कामाला येणार की दांडगा जनसंपर्क हे आता स्पष्ट होणार आहे. याबाबत ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.
हेही वाचा >>> नवी मुंबई : माथाडींच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडू; पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटीलांचा ईशारा
मतदानाच्या दिवशी सर्व मतदारसंघातील मतदान केंद्रावर फिरलो. त्यावेळी चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यामुळे विजय निश्चित आपलाच होईल असा विश्वास आहे. विरोधकांनी हिरव्या पेनांच्या नावाने हिरव्या नोटांच्या वाटपाच चर्चा आहे. आपली आर्थिक स्थिती सामान्य बेताचीच असल्याने आपल्या विरोधकाकंडूनच वाटप केले असले तरी आपणच विजयी होऊ अशी खात्री वाटते.
बाळाराम पाटील, शेकाप, महाविकास आघाडी उमेदवार