वाशी सेक्टर २६ येथील तुर्भे रेल्वे यार्डात सिमेंट भराई मशिन मुळे ध्वनी प्रदुषण होत असल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सदर आवाज कमी तसेच या प्रकल्पाबाबत आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना रेल्वे यार्ड व्यवस्थापकांना दिल्या होत्या.मात्र सदर सूचना देवून ही परिस्थिती जैसे थेच असल्याने अखेर प्रदूषण मंडळाने भारतीय कंटेनर निगमला कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसात खुलासा मागवला आहे.
हेही वाचा >>> अलिबागकरांचा श्वास कोंडला, कचराभूमीतील आगीमुळे शहरावर धुराचे साम्राज्य
वाशी सेक्टर २६ ला लगत असलेल्या रेल्वे यार्डात दोन तीन महिन्यांपूर्वी सिमेंट भराईचा प्रकल्प उभारला आहे. मात्र सिमेंट भरताना या प्रकल्पातील मशीनचा कर्णकर्कश आवाज येतोय. ही मशीन रात्री अप रात्री देखील सुरू असल्याने रहिवाशांची झोप मोड तर होतेच शिवाय मुलांच्या अभ्यासात देखील आवाजाने व्यत्यय येत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना या ध्वनी प्रदूषणाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मशीनच्या आवाजावर अंकुश आणावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती. यावर नवी मुंबई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधी तुर्भे रेल्वे यार्ड व्यवस्थापकांना पत्र दिले होते .त्यात सिमेंट प्रकल्पाभोवती पत्रे बसवणे, संरक्षक भिंत बांधणे, उडणाऱ्या धुळीवर पाणी मारणे, झाडे लावणे तसेच आवाजाची मर्यादा कमी ठेवणे,आदी सूचना केल्या होत्या. मात्र सदर सूचना करून देखील ही परिस्थिती जैसे थेच निदर्शनास येत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी प्रदूषण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. वारंवार सूचना देवून ही ध्वनी प्रदुषण होत असल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी. बी. पाटील यांनी भारतीय कंटेनर निगमला कारणे दाखवा नोटीस बजावली असून ७ दिवसात खुलासा मागवला आहे . अन्यथा पुढील कार्यवाहीचा ईशारा दिला आहे.