नवी मुंबई : शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यामधून होत असलेल्या जल आणि वायू प्रदूषण विरोधात प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी २०२३ ते ३० ऑगस्टपर्यंत प्रदूषण करणाऱ्या एकूण ६५ कंपन्यावर प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. नवी मुंबई शहराच्या पूर्वेकडे मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथील रासायनिक कंपन्यामधून रासायनिक मिश्रित द्रव्य तसेच वायू सोडला जातो. त्यामुळे एमआयडीसी लगत असलेल्या वाशी, कोपरखैरणे, तुर्भे घणसोली इत्यादी विभागात वायू प्रदूषण होत असते. मागील दोन दिवसांपासून वाशी, कोपरखैरणेत रात्रीच्या वेळी हवा प्रदूषण पहावयास मिळत आहे. याविरोधात स्थानिकांनी वारंवार प्रदूषण मंडळाकडे तक्रारी केल्या जात आहेत.
यावर प्रदूषण मंडळाने महापालिका आणि एमआयडीसी या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला असून यामध्ये रासायनिक कंपन्यांसोबत येथील नागरी वस्त्यांमधून देखील सांडपाण्याद्वारे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यावर तात्काळ लघुकालिन, मध्यावधी व दीर्घकालीन उपाय योजना करण्याच्या सूचना मार्च महिन्यात देण्यात आल्या होत्या. मात्र सदर सूचना देऊन देखील येथील कारखानदारांनी प्रदूषणाचे सत्र कायम ठेवले आहे.
त्यामुळे अशा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून जानेवारी २०२३ ते ३० ऑगस्टपर्यंत प्रदूषण करणाऱ्या एकूण ६५ कारखान्यांवर प्रदूषण मंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस वायू तसेच जल प्रदूषण वाढत आहे. याचा मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम पाहता अशा प्रकारे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरोधात १८ जणांना कारणे दाखवा नोटीस ,३१ जणांना प्रस्तावित निर्देश, १४ जणांना अंतरिम निर्देश व २ जणांना कारखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांकडून शहरात वायू तसेच जलप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्यानुसार प्रदूषण मंडळाकडून त्याची पाहणी करून दोषी आढळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाते. जानेवारी ते आतापर्यंत ६५ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली असून पुढील कालावधीत प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईल. असे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी म्हटले आहे.