नवी मुंबई – येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत काँग्रेस पक्षात खिंडार पडल्याची चर्चा गेले दोन दिवसांपासून सुरु होती. परंतू, अनिल कौशिक यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेस पक्षाला कोणताही धक्का बसलेला नाही असे म्हणत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाशीतील काँग्रेस भवनबाहेर रस्त्यावर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्याबाबत निश्चय केला. निवडणुकीत पक्षाला सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणू असा एकमताने संकल्प केला.
ऐन विधानसभा निवडणूकीच्या काळात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली होती. परंतू, अनिल कौशिक पक्षातून गेल्याबद्दल वाशी येथील काँग्रेस भवनाबाहेर काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रसचे नवी मुंबई प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी भवनाच्या दरवाजाचे टाळे काढून भवनात लावण्यात आलेल्या बॅनरवरून अनिल कौशिक यांचा फोटो फाडून फेकला. तर, युवानेते अनिकेत म्हात्रे यांनी लिंबू मिरची बांधून भवनाची प्रतिकात्मक नजर उतरवल्याचेही दिसून आले.
हेही वाचा >>> Ganesh Naik: ‘माझे विरोधक स्वर्गवासी झाले, एकही जिवंत नाही’, भाजपा नेत्याच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक
यावेळी काँग्रेस भवनमध्ये जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत, पक्षाला अधिक मजबूत करण्याचा निश्चय व्यक्त केला. तसेच निवडणुकीत पक्षाला सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणू असा एकमताने संकल्प केला आहे. काँग्रेस भवनमध्ये झालेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे काँग्रेस पक्षात एक नवी उमेद निर्माण झाली आहे.
स्वत:च्या स्वार्थासाठी आणि पुत्र प्रेमासाठी पक्ष सोडून गेले
जे कोणी पक्ष सोडून गेले आहे, ते स्वत:च्या स्वार्थासाठी आणि पुत्र प्रेमासाठी गेले आहेत. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाला कोणताही फरक पडलेला नाही. याआधी सुद्धा त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली होती. परंतू, तरीही पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवतं त्यांना पुन्हा पाचवर्ष काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद दिले. जिल्हाध्यक्ष असताना फक्त त्यांना सेक्टर १७ आणि त्यांच्या मुलाचा वॉर्ड याशिवाय दुसरं काही दिसतं नव्हते, असे वक्तव्य यावेळी रविंद्र सावंत यांनी केले.