नवी मुंबई : महाराष्ट्रातील एक सुनियोजीत आणि सुविधांनी नटलेले शहर असा नावलौकीक असलेल्या नवी मुंबईतील प्रचारात सध्या छुप्या हिंदुत्वाचा गजर कानी पडू लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रभावी भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेताच त्यांच्या समर्थकांनी ‘राम कृष्ण हरी….वाजवा तुतारी’चा दिलेला नारा गाजला होता. गेल्या काही दिवसांपासून बेलापूर विधानसभा मतदारसंघात प्रमुख रस्त्यांच्या कडेला ‘राम कृष्ण हरी’ इतक्याच ओळी लिहिलेले फलक झळकू लागले असून यामुळे सावध झालेल्या भाजपच्या प्रचारकांनी ‘जय श्री राम’ म्हणत गल्लोगल्ली सुरु केलेला प्रचारही सध्या चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, राम कृष्णाची नाव घेत सुरु असलेल्या या प्रचाराला मनसेच्या कार्यकर्त्यानी ‘यंदा गजाननाची वारी’ अशी जोड दिल्याने बेलापूरच्या प्रचारात सुरु असलेला हा देवनामांचा गजर चांगलाच चर्चिला जाऊ लागला आहे.
नवी मुंबई भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावर असलेले संदीप नाईक यांनी पक्षाचा राजीनामा देत बेलापूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली. संदीप हे बेलापूरमधून अपक्ष म्हणून रिंगणात असतील अशी सुरुवातीला चर्चा होती. मात्र समर्थकांसोबत केलेल्या चर्चेनंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय पक्का केला. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या एका निर्धार मेळाव्यात अगदी शेवटच्या क्षणी संदीप यांचा ‘तुतारी’ हाती घेण्याचा निर्णय पक्का करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या काही कट्टर समर्थकांनी उत्साहाच्या भरात दिलेली ‘राम कृष्ण हरी’ ही घोषणा चांगलीच गाजली. निवडणुकांच्या प्रचारात कोणत्याही जाती, धर्म अथवा थेट देवदवतांच्या नावाने प्रचार करण्याची मुभा नाही. असे असताना बेलापूर मतदारसंघात प्रमुख उपनगरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ‘राम कृष्ण हरी’ अशी अक्षरे असलेले मोठे फलक लागले. वाशी टोलनाक्यावर भल्या मोठ्या फ्लेक्सवर हीच नामे झळकू लागली. ही अक्षरे इतक्या मोठ्या पद्धतीने का झळकत आहे असा प्रश्न भल्याभल्यांना पडला असतानाच संदीप यांच्या प्रत्यक्ष प्रचारात ‘राम कृष्ण हरी…वाजवा तुतारी’ या घोषणा दुमदूमु लागल्या. तेव्हा गल्लोगल्ली झळकणारे हे फलक संदीप यांच्या प्रचाराची रणनिती असल्याची कल्पना अनेकांना आली.
हेही वाचा – डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, राजू पाटील एकीने शिंदे यांच्या गोटात चुळबूळ
भाजपच्या बैठकीत रामाचा नारा ?
संदीप यांचा ‘राम कृष्ण हरी’चा नारा सगळीकडे घुमू लागल्याने भाजपच्या ठराविक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या प्रचाराला उत्तर कसे द्यायचे यावरुन बराच काळ चर्चा झाल्याचे समजते. बेलापूर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फळीही सक्रिय झाली आहे. शहरातील वेगवेगळी रेल्वे स्थानके, बाजारपेठा यामध्ये संघ परिवाराशी संबंधित कार्यकर्ते थेट प्रचारात उतरलेले दिसू लागले आहेत. संदीप नाईक हे बराच काळ भाजपचे शहराचे अध्यक्ष राहिले होते. त्यामुळे वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असलेल्या कार्यक्रमांना त्यांनी सढळ हस्ते मदत केलेली आहे. यामुळे यापैकी काही जण संदीप यांच्या समवेत दिसत आहेत. हे लक्षात आल्याने संघ परिवाराने जोमाने प्रचार सुरु केलेला पहायला मिळत आहे. हा प्रचार करत असताना ‘राम कृष्ण हरी’ला ‘जय श्री रामा’ने दिले जाणारे उत्तर सध्या शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.
हेही वाचा – बंडखोरीवरून वरपूडकर- बाबाजानी यांच्यात कलगीतुरा
मनसेचा असाही प्रचार…
बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनसेचे गजानन काळे हे सलग दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांनी ३० हजारांच्या आसपास मते घेतली. यावेळी काळे हेदेखील पद्धतशीर प्रचाराची यंत्रणा राबविताना दिसत आहेत. देवनामांचा गजरात सुरु असलेला प्रचार लक्षात घेऊन मनसे यांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून ‘राम कृष्ण हरी ….यंदा गजाननाची वारी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्याने या प्रचारात कल्पनांची भर पडू लागली आहे.