उरण : शेकडो वर्षांपासून जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्त बम…बम… भोलेच्या जोरदार घोषणा देत येतात. बेटावर येणाऱ्या हजारो भाविकांनी येथील प्राचीन शिवलेणी, त्रिमूर्ती आणि शिव अवताराच्या दर्शनासाठी शुक्रवारी अलोट गर्दी केली होती. यावेळी शिवभक्त व पर्यटकांच्या सुरक्षितता, स्वागत आणि जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यासाठी पोलीस, बंदर, महसूल यंत्रणेसह ग्रामपंचायत, नागरी सुरक्षा दल आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते काम करीत होते. मात्र या वर्षी घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटींच्या एकेरीच्या तिकीट दरात ६५ रुपये दर आकारणी करण्यात आली. दर्शनासाठी येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईपासून अवघ्या ११ किमी अंतरावर असलेले घारापुरी बेट सहाव्या शतकातील प्राचीन शिवकालीन लेण्यांमुळे कायम जागतिक प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे. काळ्या पाषाणात शिवाची विविध रुपे असलेली अनेक प्रचंड शिल्प आहेत. मोठ्या खुबीने कोरलेल्या शिल्पांमध्ये अर्धनारीनटेश्‍वर शिव, कल्याणमूर्ती, अंधकासुरवध, गंगावतारण शिव, योगीश्‍वर उमा महेश्‍वरमूर्ती आणि २० फुट उंच आणि रुंदीची ब्रम्हा, विष्णू व शिवाची महेशमूर्ती आदि शिल्पांचा समावेश आहे.

हेही वाचा – आमच्या उमेदवारीची जबाबदारी भाजपची – खासदार बारणे

महाशिवरात्री निमित्ताने बेटावरील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. त्यामुळे घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते. घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने बेटावर जाण्या-येण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया, जेएनपीए, उरण-मोरा, न्हावा, वाशी, बेलापूर, उलवा, माहूर, ट्रोमबे आदी बंदरातून लहान होड्या, लॉचेस, मचव्यांची सोय आहे.

घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच धोकादायक ठरणाऱ्या नादुरुस्त रस्त्यावर रेलिंग लावण्यात आल्या होत्या. तसेच भाविकांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी नागरी सुरक्षा दलाचे रक्षक तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर बेटावर महाशिवरात्री निमित्ताने मोरा-उरण बंदरातूनच दरवर्षी ५० ते ६० हजार भाविक हजेरी लावतात. मोरा बंदरातून बेटावर येणाऱ्या शिवभक्त भाविकांसाठी पोलीस, बंदर विभागाच्या माध्यमातून १२ खासगी ट्रॉलर्स तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. घारापुरी बेटावर महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या शिवभक्तांनी नियम पाळून शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा – पनवेलमधून ६१ किलो गांजा जप्त, अंमलीपदार्थ विरोधी कक्षाची कारवाई

महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या हजारो देशी-विदेशी शिवभक्तांमुळे बम…बम… भोलेचे सूर घुमत होते. तिकीट दरवाढीमुळे बेटावरील भाविकांची संख्या कमी होऊ नये यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने बंदर विभागाला तिकीट दर न वाढविण्याची मागणी केली होती. त्यामुळे यावर्षी मागील वर्षीच्या दरातच भाविकांना प्रवास करता आल्याची माहिती घरापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahashivratri 2024 thousands of devotees on the occasion of mahashivratri at gharapuri island a lot of crowd for darshan of shivleni and trimurti ssb