महाशिवरात्रीला भक्तांनी शिवलिंग दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी महादेव मंदिरांवर अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात आली होती. मंदिरामध्ये पहाटे शिवलिंगावर पंचामृतांनी अभिषेक करण्यात आला. शिवलिंगावर बेल, फुले वाहण्यात आली, तर भजन आणि कीर्तनात भाविक दंग झाले होते.
आनंदनगर येथील शंकर मंदिर, वाशी येथील जागृतेश्वर मंदिर, सानपाडामधील शिवमंदिर, पाम बीच येथील बुद्धेश्वर शिव मंदिर, महापे एमआयडीसीमधील बावखळेश्वर मंदिर, पावणे येथील पावणेश्वर मंदिर, घणसोली गावातील महादेवाच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी हरिनाम सप्ताहाचा जागरही सुरू झाला आहे.
नवी मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिरांत सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. काही मंडळांनी उपासासाठी साबुदाणा खिचडी आणि ताक वाटप केले.
महाशिवरात्रीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.