नवी मुंबई: अनेक अडथळ्यांनंतर वाशी सेक्टर ३ येथे पालिकेची बहुउद्देशीय इमारत उभी राहिली असून बरीच वर्षे विविध ठिकाणी भाड्याने जागा घेऊन कार्य करणाऱ्या साहित्य-संस्कृती, कला, सामाजिक संस्था पुन्हा एकाच छताखाली आल्याचा आनंद जुन्याजाणत्या नवी मुंबईकरांसह नेटाने संस्था चालवणाऱ्या संस्थांना झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाशी सेक्टर ३ येथील जुन्या समाजमंदिराच्या ठिकाणी कला, क्रीडा, साहित्य-संस्कृती जपणाऱ्या संस्थांचे कार्य नवी मुंबई शहराच्या सुरुवातीच्या काळात खूप महत्त्वाचे होते. वाशी येथील जुन्या समाजमंदिराच्या वास्तूच्या जागेवर नव्याने समाजमंदिरासह बहुउद्देशीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव २०११ रोजी मंजूर झाला व प्रत्यक्ष कामाचा कार्यादेश २०१४ रोजी दिल्यानंतर ठेकेदाराने केलेल्या विलंबामुळे वाशी सेक्टर ३ येथे पोलीस ठाण्याच्या बाजूला हे काम अनेक वर्षे अर्धवट स्थितीत पडून होते.

हेही वाचा… बीपीसीएल कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू

लोकप्रतिनिधींसह या संस्थांनी पालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शहर उभे राहिल्यानंतर टाऊन लायब्ररी सुरू करण्यात आली होती. स्व. विवेक भगत यांनी म्युझिक अ‍ॅन्ड ड्रामा सर्कलच्या माध्यमातून स्थानिक कलाकार घडवले होते. स्त्रीमुक्ती संघटनेसह नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, नूतन महिला मंडळ, नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब या संस्थांनी आपले काम अहोरात्र सुरू ठेवल्याने पालिकेने नव्या इमारतीत या संस्थांना जागा दिली आहे.

नवी मुंबई शहर उभे राहिल्यानंतर वाशी येथील समाजमंदिरात टाऊन लायब्ररीने वाचनसंस्कृती जपण्याचे काम केले, ते निरंतर सुरू राहणार असून विद्यााथ्र्यांसाठी अभ्यासिकाही सुरू करता येणार आहे. – विजय केदारे, सचिव, टाऊन लायब्ररी

स्व. विवेक भगत यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षे कला जोपासण्याचे काम करत आहे. आता विविध नाटके, एकांकिका निर्मिती करताना जागेची अडचण सतत येत होती; परंतु आता आणखी जोमाने काम करण्याची ऊर्मी मिळणार आहे. – वासंती भगत, अध्यक्ष नवी मुंबई म्युझिक अ‍ॅन्ड ड्रामा सेंटर

नवी मुंबई शहराची निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या शहरात सुरुवातीला कला, साहित्य, संस्कृती जपण्याचे काम शहरातील या विविध संस्थांनी केले आहे. त्यामुळेच या शहराला सुसंस्कृतपणाचा एक चेहरा मिळाला आहे. त्यामुळे या संस्थांना पालिकेने मूळ ठिकाणीच जागा दिल्याचा आनंद आहे. – राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma jyotiba phule smriti bhavan building of nmmc erected at vashi hence cultural social organizations have again come under one roof dvr