उरण : मंगळवारी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने मताधिक्य मिळविले आहे. या मतदारसंघात भाजपचे अपक्ष विद्यमान आमदार असताना महाविकास आघाडीने अधिकची मते घेतल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये महायुतीचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांना ९१ हजार २८५ तर महाविकास आघाडीचे संजोग वाघिरे यांना १ लाख ४ हजार ५३५ म्हणजे १३ हजार २५० असे मताधिक्य मिळाले आहे.

उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची आघाडी होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अपक्ष विजयी आमदार महेश बालदी यांना ७५ हजारपेक्षा अधिक मते मिळाली होती. तर त्यांच्याविरोधात स्वतंत्र निवडणूक लढविणाऱ्या अखंड शिवसेनेला ७० हजार तर शेतकरी कामगार पक्षाला ६० हजार अधिक काँग्रेस अशी एकूण जवळपास दीड ते पावणेदोन लाख मते मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडीला अवघी लाखभर मते मिळाली आहेत.

हेही वाचा – नवी मुंबई : मुदत संपूनही शहरात विकासकामे सुरूच, चौकांच्या अर्धवट काँक्रिटीकरणामुळे डांबरीकरणाची वेळ, पावसाळ्यात वाहन कोंडीची शक्यता

मागील पाच वर्षांत शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. असे असले तरी महाविकास आघाडीला तुलनेने कमी मते मिळाली असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. मात्र दुसरीकडे महायुतीच्या मतांत वीस हजारांहून अधिक मतांची वाढ झाली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : रस्त्यावर एकावर चाकू हल्ला, बार आणि लॉजमध्ये घुसून टोळक्याचा धुडगूस, पाच जणांवर गुन्हा दाखल

उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा वरचढ आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मताधिक्य मिळणार हे स्पष्ट होते. तसे झाले, मात्र तरीही या मतदारसंघात अपेक्षित मतांची आघाडी न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतही शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.