नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती निवडणूक बिनविरोध झाली असून सभापतीपदी ठाण्याचे शिंदे गटाचे प्रभू पाटील तर उपसभापती पदी नागपूरचे हुकुमचंद आमधरे यांची निवड झाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता महायुतीचे वर्चस्व असणार आहे. प्रभू पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, तर गणेश नाईक यांच्याशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत सोमवारी सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली असून यामध्ये प्रभू पाटील बिनविरोध निवडून आले. राज्यातील सर्व बाजार समितींची शिखर बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती पद दोन वर्षांपासून रिक्त असल्याने बाजार समितीमधील अनेक महत्त्वाचे निर्णय रखडले आहेत. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी निवडणुका घ्याव्यात अशी मागणी संचालक जयदत्त होळकर यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने बाजार समितीला या दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार सभापती व उपसभापती निवडणूक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मुंबई एपीएमसी येथील प्रशासकीय इमारतीत पार पडली.
बिनविरोध निवड
सभापती पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी म्हणून अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट यांच्यात चुरस होती. प्रभू पटेल यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडद्यामागून ताकद लावली असली तरी मंत्री गणेश नाईक यांनीही मोलाची भूमिका बजावल्याचे सूत्रांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd