ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बालाजी समूहाचा संचालक महेंद्र सिंग याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ११ तारखेपर्यंत वाढ केली. पोलिसांनी सिंगवर मोफ्फा अंतर्गत कारवाई केली आहे. पनवेल येथील न्यायालयातील न्यायाधीश अर्चना ताम्हाणे यांनी ११ तारखेपर्यंत सिंगला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ३ तारखेला सिंगला न्यायालयात हजर केल्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयाच्या परिसरात ठिकठिकाणाहून आलेल्या गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती.
सरकारी वकील जयश्री कुलकर्णी यांनी न्यायालयात बाजू मांडली. नवी मुंबई अ‍ॅक्शन फोरमचे वकील के. एस. पाटील यांनी पीडित ग्राहकांची बाजू न्यायालयात मांडली. सिंग याच्या वकिलाने सिंगला जामिनावर सोडल्यास तो गुंतवणूकदारांच्या रकमेची सोय करू शकेल, असा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला होता. मात्र सरकारी वकील कुलकर्णी आणि फोरमतर्फे वकील पाटील यांनी सिंग याने २०११ पासून स्वीकारलेल्या घरांच्या रकमेनंतरही घरे न दिल्याचे तपशील सादर केले. सिंग याने गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या रकमेचे काय केले, त्याच्यासोबत या गुन्ह्य़ात अजून त्याचे साथीदार कोण आहेत, याचा शोध पोलिसांना घेता यावा म्हणून पोलीस कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारतर्फे न्यायालयात करण्यात आला.

Story img Loader