उपनगराध्यक्षपदी सुजाता गायकवाड
उरण नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक महेश बालदी यांची, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुजाता गायकवाड यांची निवड बिनविरोध झाली आहे. उरण नगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार अशी शक्यता होती. परंतु ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे उत्सुकता वाढली होती. परंतु वरिष्ठांनी वाद मिटविल्याने निवडणुकीची औपचारिकता पार पडली. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली.
नगरपालिकेली भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्षपद आणि उपनगराध्यक्षपद प्रत्येकी अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचे ठरले होते. कालावधी संपल्यानंतर पदाचा राजीनामा देण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते. मात्र शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी आश्वासनाप्रमाणे राजीनामा न दिल्याने भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा वाद पोहोचला होता. या वेळी वाद मिटवताना वरिष्ठांनी युती कायम ठेवण्याचे आदेश दिल्याने ही निवडणूक जाहीर झाली होती. भाजपला नगराध्यक्षपद देण्याची वेळ आल्यानंतर भाजपचे उरणमधील सर्वेसर्वा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्ती महेश बालदी यांनी नगराध्यक्ष, तर उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या विरोधात अर्ज आला नाही. त्यामुळे गुरुवारी निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता पार पाडण्यात आली. त्यात निवडणूक निर्णय अधिकारी नितीन चव्हाण यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या नावांची घोषणा करून निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजप जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे अभिनंदन करण्यात आले. तर शिवसेनेनेही फटाक्यांची आतषबाजी करून आपला आनंद साजरा केला.
उरणच्या नगराध्यक्षपदी महेश बालदी बिनविरोध
शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे उत्सुकता वाढली होती.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 19-02-2016 at 02:11 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh baldi elected unopposed mayor of uran