पनवेल : पनवेल शहरामधील अरुंद रस्त्यांमुळे रहिवाशांना सततच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाकडे लक्ष वेधले आहे. तीन महत्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाची अधिसूचना बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाहीर केली. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असून भूसंपादनानंतर पनवेलचे मुख्य रस्ते प्रशस्त होतील अशी चिन्हे निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल महापालिकेने शहराच्या अंतर्गत रस्ते प्रशस्त करण्यासाठी अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारुन रस्ते प्रशस्त केले. परंतु अजुनही मूळ पनवेल शहरातील अनेक मुख्य रस्ते प्रशस्त करणे शिल्लक आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने यासंदर्भात रस्त्यांची रचना सुचविल्यानंतर पालिकेच्या नगररचना विभागाने सुधारित प्रारुप विकास आराखड्यात शहरातील तीन मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाची शिफारस केली. मात्र काही मालमत्ताधारकांचा भूभागाशिवाय हे रुंदीकरण शक्य नाही.

पालिकेच्या नगररचना विभागाने याबाबतचा प्रस्ताव पनवेलचे उपविभागीय अधिका-यांकडे पाठविल्यावर बुधवारपासून तीन महत्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाची अधिसूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाहीर केली. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असून भूसंपादनानंतर पनवेलचे मुख्य रस्ते प्रशस्त होतील अशी चिन्हे निर्माण झाली आहे.

पनवेल शहरामध्ये ये-जा करण्यासाठी दहा लहानमोठे रस्ते आहे. सध्या पनवेल शहरात वाहनांची संख्या जास्त आणि रस्ते अरुंद या समस्येमुळे सणाच्या दिवसांमध्ये शहरात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. पनवेल महापालिकेने शहराचा प्रारुप विकास आराखड्यानुसार शहरातील अंतर्गत मुख्य रस्ते ३० फूटी असावे असे नियोजन केले आहे. बुधवारी पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी अधिसूचना काढली. जय भारत नाका ते अन्नपूर्णा ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, जय भारत नाका – विरुपाक्ष मंदिर ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आणि आदर्श हॉटेल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या मार्गांवर काही ठिकाणी अरुंद रस्ते असल्याने मालमत्ताधारकांना भूसंपादन कायदा २०१३ नुसार वाटाघाटीने नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

काही जुने घर आणि इमारतींची बांधकामे रस्त्यापासून काही मीटर हटवावी लागणार आहेत. तीन रस्ते रुंदीकरणासाठी ५,४३० चौरस मीटर जागेची गरज आहे. या जागेचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत रस्ते रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात केली जाईल. रस्ते रुंदीकरणासाठी पनवेल महापालिका सुमारे २० कोटी रुपये खर्च करणार आहे.

रुंदीकरण होणारे रस्ते

लोकमान्य बाळगंगाधर टिळक मार्ग (जय भारतनाका ते अन्नपुर्णा ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक) – १८८६.९४ चौ. मी. रस्ता रुंदीकरण

महात्मा ज्योतिबा फुले मार्ग (जय भारत नाका – विरुपाक्ष मंदिर ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक) – २४०३.९७ चौ. मी. रस्ता रुंदीकरण राम गणेश गडकरी मार्ग (आदर्श हॉटेल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक) – ११३९.४० चौ. मी. रस्ता रुंदीकरण