पूनम धनावडे
उचल नसल्याने माल उकिरडय़ावर; दोन दिवसांत ८० कोटींचा फटका?
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शासनाच्या धोरणाविरुद्ध पुकारलेला बेमुदत संप बुधवारी संध्याकाळी मागे घेतला असला तरी सलग दोन दिवस बाजारातील व्यवहार बंद असल्याने कलिंगड, पपई, संत्री, मोसंबी आदी फळे सडल्याने अक्षरश: उकिरडय़ावर फेकून देण्यात आली. शेतकरी व वाहतूकदारांचा ८० कोटींचे नुकसान झाल्याचा आंदाज आहे.
शेतमाल खरेदी-विक्रीवरील बाजार समितीचे नियंत्रण कमी करण्यासंदर्भात शासनाने स्वीकारलेल्या धोरणाचा निषेध म्हणून गेले दोन दिवस मुंबई तुर्भे कृषी उत्पन्न बाजार समितीतील सारे व्यवहार ठप्प होते. कांदे-बटाटे, भाजीपाला, विविध फळे फार दिवस राहत नाहीत. त्यामुळे बाजारात असलेल्या हजारो टन नाशवंत मालाचे करायचे काय असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला होता. सोमवारपासून विविध फळांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
फळ बाजारात सोमवारी आलेला शिल्लक माल पडून होता. यामध्ये विशेषत: पपई, कलिंगड, टरबूज, संत्री, मोसंबी आणि सफरचंदांचा समावेश होता. बाजारातील काही व्यापाऱ्यांकडे प्रत्येकी ४ ते ५ टन पपई पडून होती. कलिंगड आणि टरबूज मोठय़ा प्रमाणात शिल्लक राहिले होते. बाजारात खाली उतरविलेला माल तर शिल्लक होताच, त्याचबरोबर ५० गाडय़ा मालासहित बाजार आवारात उभ्या होत्या. बहुतेक कलिंगड खराब होऊन त्यातून पाणी निघत होते. सुमारे ५० ते ६० टन कलिंगड शिल्लक राहिले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. संत्री आणि मोसंबीही मोठय़ा प्रमाणात कचऱ्यात फेकून द्यावी लागली.
भाजीपाला बाजारातही रताळे, आले, काकडी, वांगी, भोपळा, सुरण मोठय़ा प्रमाणात शिल्लक राहिले होते. यामध्ये भोपळ्याला मोठा फटका बसला होता. जवळ जवळ ७ लाख ते ८ लाखाचा १२ टन भोपळा सोमवारपासून पडून होता. उन्हामुळे भोपळा लवकर खराब झाला. ५ टन ते ६ टन सुरणही शिल्लक राहिले होते. कांदाबटाटा बाजारातही १०० गाडय़ा माल शिल्लक होता. त्यातील ५० गाडय़ा बाजाराच्या आवारातच उभ्या होत्या.
किरकोळ विक्रेत्यांची ठाणे, कल्याण, दादरकडे धाव
एरवी नवी मुंबईतील किरकोळ व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजारात जात असतात. मात्र बाजार पूर्णत: बंद असल्याने इतर पर्याय म्हणून बहुतेक विक्रेत्यांनी दादर, ठाणे आणि कल्याणच्या बाजारात मोर्चा वळविला. कारण नवी मुंबईतील बाजारात प्रवेशबंदी असल्याने राज्यातून येणारा शेतमाल ठाणे, कल्याण आणि मुंबईला पाठविण्यात आला होता. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर चढे होते. सर्वसाधारणपणे एका किलो भाजीसाठी किमान ८० रुपये मोजावे लागत होते. पालेभाज्यांचा तर पत्ताच नव्हता.
सोमवारपासून माल बाजारात असल्याने संत्री खराब झाली आहे. ती उकिरडय़ावर फेकण्यात आली. कलिंगड आणि पपईचीही तीच परिस्थिती झाली होती.
– बारक्याभाई बेलुदे, व्यापारी, घाऊक फळ बाजार.