उरण : जेएनपीए बंदरातील जेएनपीए ते पळस्पे व नवी मुंबईला जोडणाऱ्या आम्र मार्ग या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांना अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे उरण- पनवेल मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. तसेच या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा मार्गातही खड्डेच खड्डे पडले आहेत. हजारो अवजड वाहनांच्या या मार्गावर खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
जेएनपीए आणि भारतीय महामार्ग प्राधिकरण(एन एच आय)च्या गव्हाण फाटा(रेल्वे पूल),गव्हाण उड्डाणपूल येथील मार्गाला प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. याच मार्गावरून उरण, पनवेलमधील नागरिकांना एसटीचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेएनपीए ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरील बंदराला जोडणाऱ्या करळ पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून ये जा करणाऱ्या वळणावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. यातील काही खड्डे पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने बुजविण्यात येत आहेत. पळस्पे फाट्यावर जाणारा भिंगारी मार्ग तर खड्ड्यात गेला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणच्या काँक्रीटीच्या रस्त्याला ही खड्डे पडले आहेत. नांदगाव आदी परिसरातही रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले आहेत.
हेही वाचा…नवी मुंबई : बांधकाम परवानगी देतानाच प्रदूषण नियंत्रण नियमांची अट
जेएनपीटी प्रशासनाने खड्डेमुक्त मार्ग झाल्याचा दावा केला होता. मात्र उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले आहेत. जेएनपीटी आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा मार्ग उभारण्यात आला आहे. यासाठी तब्बल ३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र या मार्गालाही खड्डे पडल्याने प्रवासी व वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी एनएचआय कडून केली जात आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज १५ हजारापेक्षा अधिक वाहने ये जा करीत आहेत. कंटेनर वाहने वेगाने हाकली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हा मार्ग त्वरित दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
हेही वाचा…पनवेल: खड्ड्यामुळे २४ वर्षीय तरुणी ठार
उरण पनवेल एसटी बसही गव्हाण फाटा येथून पनवेलकडे तर पनवेलकडून बांबावी पाडा मार्गे उरणकडे येणाऱ्या बस या जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरून जात आहेत. या मार्गाला भले मोठे खड्डे पडल्याने वाहन खड्ड्यातून हिंदकळत न्यावे लागत आहे. खोपटे कोप्रोली आणि इतर रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. या संदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचआय) चे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.