ठाणे-बेलापूर मार्गावरील तुभ्रे आणि रबाले येथे रस्ता ओलांडताना होत असलेल्या रस्ते अपघात रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने दोन्ही ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव बुधवारी सर्वसाधरण सभेत मंजूर केला.
मागील महिन्यात तुर्भे रेल्वे स्थानकानजीक रस्ता ओलांडताना माय-लेकाला जीव गमवावा लागला होता. यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्ता रोकोदेखील केला होता. तसेच रबाले तलावनजीक परिसरात व रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवक तथा महापौर सुधाकर सोनवणे यांनी या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याची मागणी केली होती.
तुभ्रे येथील पादचारी पुलांसाठी तीन कोटी १२ लाख ९२ हजारच्या खर्चाला मंजुरी मिळाली असून हा पूल ३२ मीटर लांबी आणि दोन मीटर रुंदीचा होणार आहे. तर रबाले येथील पादचारी पुलासाठी १४ कोटी ४१ लाखांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. ३६ मीटर लांब आणि दोन मीटर रुंदीच्या प्रस्तावालाही सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे.