नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबर अखेरीस परदेशी मलावी हापूस दाखल होतो. दिवसेंदिवस याची मागणी वाढत आहे. मात्र यंदा बाजारात एक दिवस आड करून मलावी हापूस दाखल होत आहे. यंदा मलावी हापूसचे उत्पादन अवघे ५० टक्के असणार आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
हापूस म्हटला की रत्नागिरी, देवगड हापूसची गोडी डोळ्यासमोर येते. देवगडचा हापूस अवीट गोडीसाठी प्रसिद्ध आहे. कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच या मलावी हापूस आंब्याची चव, रंग, सुगंध असल्याने खवय्यांना सुवर्णसंधी आहे. मलावी मधील ६०० हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. १३ वर्षांपूर्वी रत्नागिरीमधून ४० हजार हापूस आंब्याच्या काड्या मलावी मध्ये नेल्या होत्या. मलावी मधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला फळधारणा चांगली होते. त्यामुळे ग्राहक देशी हापूस इतकेच परदेशी हापूसला पसंती देत आहेत.
हेही वाचा >>>कळंबोली सर्कलला कोंडीचा फेरा,मुंब्रा,पनवेल उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल
एपीएमसी बाजारात फेब्रुवारीमध्ये देशी हापूसचा हंगाम सुरू होतो. मात्र तत्पूर्वी बाजारात नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये आफ्रिकन मलावी हापूस दाखल होतो. यंदा बाजारात डिसेंबरअखेर पर्यंत मलावी हापूस हंगाम असणार आहे. मागील वर्षी आतापर्यंत ३ हजार बॉक्स दाखल झाले होते तर आतापर्यंत केवळ १२०० बॉक्स दाखल झाले आहेत. सध्या बाजारात १२०० बॉक्स दाखल झाले असून तीन किलो पेटीला २२०० -५००० हजार रुपये बाजारभाव आहे. यंदा मलावी हापूसचे उत्पादन ५०% आहे. त्यामुळे आवक कमी होईल तसेच आकाराने लहान असलेले हापूस अधिक दाखल होत आहेत,अशी माहिती फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.