एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने जुईनगरातील एका महिलेच्या खात्यातील ३१ हजार रुपयांची रक्कम परस्पर स्वत:च्या खात्यात वळते करणाऱ्यास नेरुळ पोलिसांनी अटक केली. विकास पाटील असे आरोपीचे नाव आहे.
साक्षी सावंत या जुईनगर सेक्टर -२४ मधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेल्या. या वेळी एटीएममधून प्रथम २० हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर त्यांना आणखी २० हजार रुपये हवे असल्याने पुन्हा दुसऱ्या वेळेस एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दुसऱ्यांदा पैसे न आल्याने तिथे आलेल्या विकासने साक्षी यांना पैसे काढून देण्याचा बहाणा केला आणि तिच्याकडील कार्ड घेतले. यानंतर त्याने कार्डची अदलाबदल करून स्वत:कडील एटीएम कार्ड दिले.
पैसे निघणार नाहीत, असा समज झाल्याने साक्षी एटीएममधून बाहेर पडल्या. याच वेळी विकासने स्वत:कडील आणि साक्षीच्या एटीएमचा वापर करीत ३१ हजारांची रक्कम बँक खात्यात वळती केली. नंतर पुन्हा स्वत:च्या कार्डने ती काढली.
या व्यवहारांनतर साक्षीच्या मोबाइलवर पैसे काढले गेल्याचा संदेश गेला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने साक्षी यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी बँक खात्याची माहिती मिळवली असता ही रक्कम मालाड येथील स्टेट बँकेत विकासच्या खात्यात वळती झाल्याचे आढळले. पोलिसांनी विकासला त्याच्या मानखुर्द येथील घरी जाऊन अटक केली.

Story img Loader