नवी मुंबई : जुहूगाव येथे लॉजमध्ये महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी अशोक दळवी याला रबाले रेल्वे स्टेशन येथून पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी ही घटना घडली होती. जुहूगाव येथील संकल्प लॉजमध्ये आरोपी व हत्या झालेली महिला आली होती. पॅनकार्ड दाखवून अशोक दळवी नावाने त्यांनी रूम घेतली होती. नंतर काही वेळाने आरोपी रूममधून घाईघाईने बाहेर पडला. त्यामुळे संशय आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूम उघडली असता, महिलेची हत्या केल्याचे समोर आले होते. ही घटना पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता.  मयत महिला व आरोपी परिचित असून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. महिलेचे अन्य ठिकाणी संबंध असल्याच्या संशयावरून हत्या केल्याची आरोपीने कबुली दिली आहे.  अशोक हा रत्नागिरी येथे गेल्याचे सुरुवातीला समोर आल्यानंतर एक पथक रत्नागिरी येथे रवाना झाले होते. मात्र आज अचानक त्याच्या मोबाइलने त्याचे लोकेशन रबाले रेल्वे स्टेशन परिसर दाखवल्याने या परिसरात सापळा रचून अशोकला अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितून गीते यांनी दिली.

Story img Loader