नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी भागात चरस विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आले आहे. त्याच्या कडून एक किलो ३३८ ग्रॅम वजनाचे चरस आढळून आले आहे. सदर कारवाई तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.
संजीव प्रकाश पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नेरुळ सेक्टर वीस येथे राहतो. पेशाने टेम्पो चालक असलेला संजीव हा अंमली पदार्थ विक्री अनेक महिन्यापासून करतो. त्याच्या बाबत तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्याचा माग काढला असता तो तुर्भे एमआयडीसी भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र कधी याबाबत साशंकता होती. गुरुवारी संध्याकाळी तो तुर्भे एमआयडिसीतील निवारा लॉज परिसरात आढळून आल्याची बातमी पोलिसांना मिळाली.
आणखी वाचा-उरणच्या हवेतील मात्रेचा चढता उतरता आलेख
तात्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले यांच्या नेतृत्वाखाली सदर ठिकाणी पथक पाठवले. त्यावेळी संजीव हा दिसताच त्याला ताब्यात घेत तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कडे एक किलो ३३८ ग्रॅम वजनाचे चरस आढळून आले. हा काळा चिकट पदार्थ चरस असल्याची तज्ञ व्यक्तीने शहानिशा करताच आरोपी संजीव याला अटक करण्यात अली आहे. त्याच्या कडील एक किलो ३३८ ग्रॅम वजनाचे चरस, दुचाकी, मोबाईल आणि काही रोख रक्कम असे एकूण ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी दिली.