नवी मुंबई : विजय नाहटा यांच्या बंडाला अधिक साथ मिळू नये यासाठी उशिरा का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक गुरुवारी सायंकाळी वाशी येथे बोलावण्यात आली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात म्हात्रे यांना अजूनही शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची पुरेशी साथ मिळत नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. हे लक्षात घेऊन ही तातडीची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत महायुतीत मोठी बंडखोरी झाली असून त्यामुळे भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते सतर्क झाले आहेत. बेलापूरमधून भाजपची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज झालेले संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ धरली आहे. याच मतदारसंघात उमेदवारी मिळाली नसल्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्याविरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले रिंगणात आहेत. नवी मुंबईतील या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत बंडखोरांमध्ये चुरशीची लढाई सुरू असताना बेलापूरमध्ये नाहटा यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या मंदा म्हात्रे अडचणीत आल्याने भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातील वरिष्ठ नेते सावध झाले आहेत. विजय नाहटा यांच्या बंडाला शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातील एका मोठ्या गटाचा पाठिंबा मिळू लागल्याने भाजपच्या गोटातील अस्वस्थता वाढू लागली आहे. नाहटा यांनी बंड मागे घ्यावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गोटातून फारसे प्रयत्न झाले नव्हते.
तातडीची संवाद बैठक
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांनी सध्या म्हात्रे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली असली तरी सीबीडी, बेलापूर, नेरुळ, सीवूड्स या भागांतून नाहटा यांना शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातून प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेऊन ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी सायंकाळी वाशी सेक्टर नऊ येथील एका सभागृहात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या ठरावीक कार्यकर्त्यांची एक तातडीची संवाद बैठक आयोजित केली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांनाच मदत करायची हा मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन म्हस्के यांची वाशीत पाठवणी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विजय नाहटा यांच्या संपर्कात असलेल्या नेत्यांशी संपर्क साधून त्यांनाही या वेळी तंबी दिली जाईल, असे सांगण्यात येते.