नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार करायला आमदार मंदा म्हात्रे व विजय चौगुले यांनी सांगितले, त्यामुळे आपण पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार केली होती, असे पत्र पोलिसांना एका महिलेने दिल्याने नवी मुंबईच्या राजकारणात एकच खबळळ उडाली आहे. “३३ वर्षे सामाजिक जीवनात काम करताना कसलेही घाणेरडे काम केले नाही व कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कमरेखाली वार केले नाही. ज्या महिलेने हे पत्र दिले तिला हे पत्र द्यायला व तक्रार मागे घ्यायला कोणी सांगितले? याबाबत गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असून या पत्राची उच्चस्तरीय चौकशी करून दूध का दूध और पानी का पानी करावे”, अशी मागणी बेलापूर मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी पत्रकार परीषदेत केली.
एका महिलेने काही महिन्यांपूर्वीच गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नवी मुंबई पोलिसांत दिली होती. यामुळे नवी मुंबईतील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर याच महिलेने रविवारी पोलिसांकडे गणेश नाईक यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्याबाबतचे लेखी पत्र दिले. तसंच या पत्रात नाईक यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी मंदा म्हात्रे व शिवसेना शिंदे गटाचे विजय चौगुले यांनीच सांगितल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मंदा म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषदेत घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. “सत्य काय आहे हे नवी मुंबईकर जाणून आहेत. त्यामुळे आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. गेल्यावर्षी माझ्याच पक्षाच्या नगरसेवकाने तिची ओळख करून दिली होती. त्यावेळीही आपण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात पडणार नसल्याचे महिलेला सांगितले होते. त्या महिलेचा वापर करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी ३३ वर्षांत आपण मुंगीही मारली नसून या महिलेचा वापर केला जात असून तिच्या जिवाला धोका असून तिला व तिच्या मुलाला पोलिसांनी संरक्षण द्यावे. कारण त्या महिलेचा वापर करून आपली बदनामी करण्याचा हा डाव आहे” असा आरोप मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचा – नवी मुंबई: श्वानाला घेऊन फेरफटका जीवावर बेतला….
पत्राचा बोलवता धनी कोण?
“दिपा चौहान ही महिला काही महिन्यांपूर्वी नाईकांवर बलात्काराचे आरोप करते व आता तीच महिला मी व विजय चौगुले यांनी गणेश नाईकाविरोधात तक्रार करायला सांगितल्याचे तक्रार मागे घेण्याचे पत्र देते. त्यामुळे जनतेला या संपूर्ण प्रकरणाची माहिती आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करून सर्व सत्य जनतेसमोर आणावे. तिने दिलेल्या वेगवेगळ्या पत्रावरच्या सह्याही वेगळ्या आहेत. त्यामुळे गृहमंत्री यांनी या प्रकरणाचा पूर्ण छडा लावावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे” – मंदा म्हात्रे, आमदार, भाजपा</p>
हेही वाचा – नवी मुंबई शहरातील धारण तलाव स्वच्छतेची प्रतिक्षा कायम, एमसीझेडएमएचा अहवाल बाकी
“आमचे नेते विजय चौगुले व आमदार मंदा म्हात्रे यांच्या सांगण्यावरून पत्र दिल्याचा आरोप ज्या महिलेने केला आहे त्याच महिलेने गणेश नाईकांवर बलात्काराचे आरोप करून तक्रार दाखल केली. ही न्यायालयीन बाब असली तरी याच महिलेने नाईकांबरोबरचे फोटो व्हायरल केले होते व आपल्याला त्यांच्यापासूनचा एक मुलगा असल्याचे सांगितले होते.परंतु, आता दुसऱ्यावर आरोप करत आहे. त्यामुळे हे आरोप सहन केले जाणार नाही. तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे” – किशोर पाटकर, ठाकरे गट