महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अडचणीत आलेले माजी आमदार आणि मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष मंगेश सांगळे यांचा अंतरिम जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सांगळे यांना हादरा बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐरोली येथील सोसायटीत राहणाऱ्या मंगेश सांगळे यांनी मित्राच्याच १९ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगळे यांच्यावतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करत अटकेपासून दिलासा दिला होता.  या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. जिल्हा सत्र न्यायालाने त्यांचा अंतरिम जामीन फेटाळून लावल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी ही माहिती दिली.  सध्या मंगेश सांगळे हे फरार असून रबाळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण ?
मंगेश सांगळे यांनी धावत्या कारमध्ये माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. मी मंगेश सांगळे यांना घरी सोडा अन्यथा आरडाओरडा करु, अशी धमकी दिल्यानंतर मंगेश सांगळे यांनी मला घरी सोडले, असे पीडितेने तक्रारीत म्हटले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली होती. याच महिन्यात तरुणीची सहामाही परीक्षाही होती. सांगळेसोबतचे कौटुंबिक संबंध पाहता पीडितेने सुरुवातीला आई-वडिलांना याबाबत माहिती दिली नाही. मात्र, पालकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी मुलीशी संवाद साधला आणि तिला बोलते केले. मुलीने माहिती देताच त्यांनी रबाळे पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangesh sangle bail refused by district session court