मागील दोन दिवसांपासून उरण परिसरात ढगाळ वातावरणामुळे बहरु लागलेले आंबा पीक धोक्यात आले आहे. याशिवाय या वातावरणाचा भाजीपाला तसेच कडधान्यावरही परिणाम होऊन फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीत नवीन लसणाचा हंगाम सुरू
थंडीच्या सुरुवातीला आंबा पिकासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे, आंब्याला मोहर चांगल्या प्रकारे आला होता. तसेच येथील फळबागा कैऱ्या धरण्याच्या स्थितीत असताना, अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे मोहोर काळवंडून जाण्याची शक्यता नाकारता येत असून, कैऱ्याही गळून पडतील असा अंदाज येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणीचा मार्ग अवलंबून, आंब्याचा मोहोर व कैऱ्या वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .आंब्याप्रमाणेच भाजीपाला फळावरही या ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची भीती बागायतदार व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेवग्याच्या झाडांना यावर्षी चांगल्या प्रकारे मोहोर व शेंगाही आलेल्या असताना, ढगाळ वातावरणामुळे हा मोहोर गळू लागला आहे .वाल ,चवळी, हरभरा, तुर, मुग,पावटा, घेवडा, कलिंगड, व अन्य पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती चिरनेर मधील बागायतदार शेतकरी संतोष चिर्लेकर यांनी दिली.