नवी मुंबई : न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यासाठी अवधी लागणार आहे त्यासाठी राज्य सरकारला वेळ देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. त्यांनी नेरुळ येथील आगरी कोळी महोत्सवास भेट दिली त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षण बाबत विचारण्यात आल्यावर प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण बाबत मोठे आंदोलन उभे केले असून लवकरच आरक्षण मागणी साठी काढण्यात आलेला मोर्चा मुंबईत धडकणार आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष यांनी हे विधान केले आहे. नवी मुंबई अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव भगत आयोजित आगरी कोळी महोत्सवाला तटकरे यांनी भेट दिली असता,त्यांनी मराठा आरक्षण आणि उद्याच्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावर प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा…अटलसेतुवर पहिला अपघात? वाहनाने पुलाच्या दुभाजकाला दिली धडक
सुनील तटकरे म्हणाले की, २२ जानेवारीला राम मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अनेक वर्षांची पूर्तता करणारा असून सर्व देश आनंदित आहे,अशा वेळी आम्हालाही आनंद आहे. सकळ मराठा आरक्षण मिळावे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्या पासून आहे. जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यावा,कारण दोनवेळा न्यायालयाने नाकारलेले पक्के आरक्षण मिळण्यासाठी सरकार मनापासून प्रयत्न करत आहे,अशावेळी काही वेळ लागू शकतो त्यामुळे तो वेळ त्यांनी द्यावा,सर्व बाबींची पूर्तता झाल्यास पक्के आणि टिकणारे आरक्षण मिळू शकेल आणि मराठा बांधवांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल.मात्र यासाठी वेळ देणे आवश्यक असून जरांगे पाटील यांनीही वेळ देण्याची विनंती प्रसिद्धी माध्यमाद्वारे करीत आहे असेही तटकरे यांनी सांगितले.