नवी मुंबई : सरकारने अधिसूचनेचा मुसदा काढला आहे, ज्यात कुणबी नोंद मिळाली त्यांच्या सग्या सोयऱ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याचा अपमान होऊ नये असे आवाहन मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांनी सरकारला केले आहे. सरकारने आश्वासन पाळले नाही तर पुन्हा आझाद मैदानात येणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी वाशी येथे उपोषण सोडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य झाल्याचे सांगत शांततेत आंदोलन केल्याबद्दल कौतुक केले. गोरगरीब मराठा समाजाची वेदना मला माहीत आहे. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यशैली आहे. आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती तर नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांची जयंती झाली. दोन्ही माझे गुरू असून त्यांच्या आशीर्वादाने मी हे करू शकलो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आम्ही मतांसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी काम केले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>आमचा सेनापती इमानदार… लक्षवेधक संदेश चर्चेत

ज्यांच्या कुणबी म्हणून नोंद आहे त्यांना आणि त्यांच्या सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ३०० पेक्षा अधिक लोकांनाही मराठा आरक्षणसाठी आत्महत्या केल्या आहेत. अण्णासाहेब पाटील यांच्यापासून विनायक मेटे यांच्यापर्यंत मराठ्यांच्या बलिदानातून हे आंदोलन उभे राहिले आहे असे जरांगे यांनी स्पष्ट केले. आता ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी केले.

वाशीत जल्लोष

साडेचार महिन्यांपासून सुरू असलेले मराठा आरक्षणबाबत मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्र्यांसह जल्लोष साजरा करण्यात आला.याच वेळी मनोज जरांगे यांना फळांचा रस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange warned that he will protest again if the promise is not kept amy