नवी मुंबई शहरात दोन वर्ष करोना काळातील संकटामुळे नियमांच्या चौकटीत दिवाळी साजरी करावी लागली. परंतु ,आता निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळी साजरी करण्यात येत असून सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी केली जात असताना दुसरीकडे बेकायदा फलकबाजीला ऊत आल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे .
नवी मुंबई शहरात पालिकेची परवानगी घेऊन व पालिकेने निश्चित केलेल्या जागेतच फलक लावता येतात. परंतु एकीकडे शहरभर दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असताना रेल्वेस्थानक परिसर, शहरातील मुख्य जागा ,चौक याठिकाणी बेकायदा फलक लावण्यात आल्याचे चित्र आहे.शहरात फलक लावताना महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत तसेच मुख्यालयामार्फत जाहिरात परवाना घेणे अपेक्षित आहे. परंतु उत्साही कार्यकर्ते राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते हवे तिथे विनापरवाना फलकबाजी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे दिवाळीच्या सणात शहराचे विद्रूपिकरण झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : आजपासून सिडकोचा दिवाळी धमाका; ७ हजार ८४९ घरांची आज पासून विक्री सुरू
दिवाळीत शनिवार रविवार व सोमवार अशी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने या फलकबाजी करणाऱ्यांचे फावले. देशपातळीवर नुकताच नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ व सुंदर शहराचा देशातील तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे.परंतु सध्या दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शहरात बॅनरबाजीला ऊत आला आहे . एकीकडे सणाचा उत्साह तर दुसरीकडे बेकायदा बॅनरबाजीचा जोश असे चित्र आहे. शहरातील आठ विभाग कार्यालयामार्फत संबंधित बॅनरबाजी करणाऱ्यांना पूर्वपरवानगी दिली जाते परंतु चमकेगिरी करणारे कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे फोटो लावून बॅनरबाजी करताना पाहायला मिळतात. संबंधित विभाग कार्यालयामार्फत अशा बेकायदा बॅनर्जीवर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मुख्यालयाअंतर्गतही फुकट्या बॅनरबाजांवर बंदी घालणे आवश्यक आहे.
बेकायदा फलकबाजीला आवर घाला…….
नवी मुंबई शहरात आगामी काळात पालिका निवडणूका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी गुढघ्याला बाशिग बांधून सज्ज असलेल्यांची फुकटी बॅनरबाजी अधिक जोशात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने अशा या फुकट्या बॅनरबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापासूनच नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.