सुरक्षा वाऱ्यावर; जागोजागी कचऱ्याचे ढीग दरुगधीचे साम्राज्य, अधिकाऱ्यांचा उधळपट्टीवर भर

ऐरोली येथील महावितरण वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आता वसाहतीत वास्तव्य नको अशी ओरड करावी लागत आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये महत्त्वाच्या सुरक्षेच्या समस्यांसह सध्या कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसाहतीमध्ये मूलभूत असणाऱ्या गरजांकडे येथील अधिकारी लक्ष देत नसून नको त्या ठिकाणी लाखोंची उधळण करीत असल्याने वसाहतीमधील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

महावितरण वसाहतीमध्ये आजमितीस अ, ब, क, ड श्रेणीतील सुमारे ५०० कर्मचारी वास्तव्यास आहेत. या ठिकाणी महावितरणच्या माध्यमातून इमारतींना पाण्याची सुविधा, ड्रेनेज लाइन, तसेच इतर नागरी समस्या पुरवल्या जातात. मागील काही वर्षांपासून येथे वास्तव्य नसलेल्या परंतु या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या वसाहतीमध्ये ड्रेनेजच्या लाइनची दुरवस्था तसेच प्रत्येक इमारतीच्या खाली साचलेले कचऱ्याचे ढीग रस्त्यावर पडलेले कामाचे साहित्य, तुंबलेले गटार, पिण्याच्या पाण्याच्या अस्वच्छ टाक्या, रस्त्यांची दुर्दशा, विद्युत रोषणाई, जीर्ण झालेल्या इमारतीचे स्लॅब निखळून पडण्याच्या घटना आदी समस्यांनी वसाहतीला विळखा घातला आहे. येथे वाढलेल्या झाडीमुळे डासांची आणि मच्छरांचे प्रमाण लक्षणीय वाढल्याने रहिवाशांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळयात वृक्षाची छाटणी करण्याबरोबरच गवताचीदेखील छाटणी करणे आवश्यक आहे. परंतु ही छाटणी न करण्यात आल्याने साप आणि इतर हिंस्र प्राण्यांपासून जीव मुठीत धरून महिलांना जावे लागत आहे. वसाहतीची झालेली वाताहत पाहता त्याचे कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत. महावितरणला दरमहा घरभाडे देऊनही या नागरी सुविधा मिळत नसल्याने महावितरण वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पावसाळयापूर्वी या ठिकाणी असणारी छोटी नाले पूर्णपणे साफ करण्यात आलेली नाहीत. पावसाचे पाणी नाल्यात साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाणदेखील वाढले असून वरिष्ठ अधिकारी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. महावितरणकडून लाखो रुपये खर्च करून सुरक्षारक्षकांना बसण्यासाठी केबिन, तसेच ३० फुटांचे उंच लोखंडी टॉवर बसवण्यात आलेले आहेत. पण आजतागायत यावर सुरक्षारक्षक बसलेले नाहीत. तर वसाहतीमध्ये सोलर लाइट बसवण्यात आलेल्या आहेत पण त्यांचा कधी प्रकाशच रस्त्यावर पडला नाही. त्यामुळे अधिकांऱ्याकडून अनावश्यक खर्च करत लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. पण सीसीटीव्ही, संरक्षण भिंती, साफसफाई, रस्ता डागडुजी या मूलभूत असणाऱ्या गोष्टीवर मात्र खर्च करण्यास निधी नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐरोली येथील महावितरण कंपनी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असताना त्याचबरोबर या ठिकाणी काही वर्षांपूर्वी भंगार चोरीच्या उद्देशाने गोपाळ सौदाणे या पोलीस कर्मचाऱ्यांची हत्यादेखील करण्यात आली होती.

उधळपट्टीची चौकशी कधी

महावितरणच्या कार्यालयात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याने लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी आणि इतर कामे करण्यात आली होती.  एरवी समस्यांचा बोजवारा असणाऱ्या महावितरणच्या वसाहतीत मात्र मंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठा खर्च करण्यात आला होता. ही उधळपट्टी नेमकी कशासाठी आणि या उधळपट्टीला जबाबदार असणाऱ्या अधिकांऱ्यावर अधीक्षक अभियंता काय कारवाई करणार याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

महावितरण वसाहतीमध्ये समस्यांचा बोजवारा उडला आहे ही बाब सत्य असून लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यांवर तोडगा काढण्यात येईल. तसेच सुरक्षेच्या बाबतीतदेखील ठोस पावले उचलली जातील.

जुईली वाघ, अधीक्षक अभियंता

Story img Loader