राज्य शासनाने नुकतीच ११ हजार नवीन पोलीस भरती करण्याची घोषणा केली असताना आता मोठ्या प्रमाणात खांदे पलट होतांना दिसत आहे. नवी मुंबई पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होण्याची शक्यता आहे. खुद्द पोलीस आयुक्तांची देखील बदली होणार असल्याची खात्रीलायक बातमी आहे. परिमंडळ २ च्या उपांयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त यांच्या बदल्या होण्याचे संकेत मिळत आहेत.
नवी मुंबई शहरातील वाढती गुन्हेगारी डोकेदुखी ठरत असल्याने सामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. यात तक्रार घेण्यास टाळाटाळ करणे हीच सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. वादग्रस्त अधिकाऱ्यांना संधी दिली असल्याने पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास नागरिकांना भीती वाटत असल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळत आहे. महिला अत्याचाराच्या घटना विशेषतः सोनसाखळी चोरट्यांनी हैदोस घातला असल्याने दिवसाढवल्या देखील महिलांना असुरक्षित वाटत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे.
वाढलेली सायबर गुन्हेगारी तसेच आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात होणारी वाढ चिंताजनक आहे. नव्याने दाखल होणारे पोलीस आयुक्त तरी गुन्हेगारीचा चढता आलेख नियंत्रणात आणतील अशी अपेक्षा नागरिकांना आहे. नवी मुंबई पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही विधासभेत काढले होते. खास करून बिघडती वाहतूक व्यवस्था बिकट समस्या झाली आहे. यावर ठोस उपाय योजनेच्या ऐवजी केवळ दंड आकारण्यात धक्याता मानली जाते.
हेही वाचा- शीव-पनवेल महामार्गावरील पथदिवे बंद; केबल खराब झाल्याने अंधार
शहरात वाशी कोपरखैरणे मार्ग, कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसर, सीबीडी सेक्टर १५ दिघा जंग्शन, एपीएमसी परिसर अशा ठराविक ठिकाणी कायम होणाऱ्या वाहन कोंडीवर ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. पोलीस आयुक्त, परिमंडळ दोनचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांचा कार्यकाळ संपत आला आहे. बदलीची चर्चा पोलीस वर्तुळातही होत आहे. कडक शिस्तीचे व धडाडीचे अधिकारी येतील, असे प्रामाणिक पोलिसांची व नवी मुंबईकरांना आशा आहे.