नवी मुंबई-पनवेल परिसरात आज आयोजन
राज्यभरातील विविध शहरांत काढण्यात येत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाची मोहीम मुंबईच्या उंबऱ्याशी दाखल झाली आहे. नवी मुंबई-पनवेल परिसरात आज, बुधवारी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील सहभागींसाठी आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या ५ मुली, ५ महिला कोकण आयुक्तांना आपले निवेदन सादर करणार आहेत.
सगळ्यांचेच लक्ष लागलेल्या बुधवारच्या मोर्चाची जय्यत तयारी मराठा समाजाने केली आहे. गणेशोत्सवापासूनच या मोर्चाचा प्रचार करण्यात आला. प्रत्येक घरात तशी पत्रके वाटण्यात आली. चौकाचौकांमध्ये फलक लावण्यात आले. समाजमाध्यमांतही त्याचा प्रचार करण्यात आला. गेला आठवडाभर रायगड जिल्ह्य़ातील गावोगावी बैठकांचे सत्र चालू होते. पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी शाळा, सभागृहे, तसेच मंदिरांमध्ये झालेल्या बैठकांत मोर्चाबाबतचे नियोजन झाले. या मोर्चामुळे बुधवारी मुलांनी शाळेत जाऊ नये, वकील तसेच उच्चशिक्षितांनी एक दिवस कामावर सुट्टी घ्यावी, कष्टकऱ्यांनीही एक दिवस आपल्या हितासाठी सुट्टी घ्यावी, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे. या निमित्ताने कोणतीही धार्मिक, वा दोन समाजांत तेढ येणार नाही, याची दक्षताही मोर्चाप्रचारकांनी घेतल्याने ओबीसी समाजाच्या तरुणांनीही त्यास मोठय़ा प्रमाणात पाठिंबा दर्शवल्याचे चित्र आहे.
प्रतिसाद किती मिळणार?
पाऊस असल्याने, तसेच शहरी नोकरदार मंडळींना सुट्टी नसल्याने मोर्चाला राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळेल, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने नवी मुंबईतील कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी, आंदोलनात साडेतीन ते चार लाख कार्यकर्ते सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला.
सेल्फी नको.. गप्पा नको
या मोर्चातील सहभागींनी स्वयंशिस्त पाळावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोर्चादरम्यान सेल्फी काढू नका, गप्पा मारू नका, गुटखा व पान खाऊ नका, असे सांगण्यात आले आहे.