नवी मुंबईत गरबा दांडियाला रंग चढू लागला आहे. गाण्यांच्या तालावर तरुणाईची पावले थिरकत आहेत. यंदा गरब्यामध्ये पारंपरिक गुजरती, हिंदी गाण्याबरोबर प्रसिद्ध अशी मराठी गाणीही वाजत आहेत. मागील दोन-तीन वर्षांतील सिनेमांमधील उडत्या चालीची गाणी तरुणाईच्या ओठांवर असून नटूनथटून दांडिया खेळायला आलेल्या तरुणाईसाठी मराठी गाणीही दणक्यात वाजत आहेत. ‘शांताबाई’ हे मराठी गाणे व ‘दगडी चाळ’ या सिनेमामधील ‘मोरया’ हे गाणे यंदाच्या गरब्यात हिट झाले आहे.
यंदा गरब्यामध्ये पारंपरिक गाणी तर वाजत आहेतच, सोबत यो यो हनी सिंगची गाणीही दणक्यात वाजत आहेत. लुंगी डान्स, त्याशिवाय पिंकी है पैसेवालों की.. हुआ छोकरा जवान रे आदी गाणी आयोजकांकडून वाजवून ते तरुणाईला मंत्रमुग्ध करीत आहेत. हिंदी गाण्याबरोबर मराठी गाणीसुद्धा यंदाच्या गरब्यामध्ये धमाल उडवत असून ढोल-ताशे दणकून वाजवणारी अनेक मराठी सिनेमांमधील गाणी वाजत आहेत.
त्यामध्ये ‘शिटी वाजली, गाडी सुटली’ या गाण्यांना अधिक पसंती देण्यात आली आहे. अजय-अतुल यांचे ‘माऊली माऊली’ गाणे दांडियात दणक्यात वाजत आहे. तसेच आगरी-कोळय़ांची असणारी गाणीखील वाजवण्यात येत आहेत. नवी मुंबईतील बडय़ा नवरात्री उत्सव मंडळ आयोजकांच्या ठिकाणी तरुणाईचा मोर्चा वळला असून गरबा आणि दांडियाचा आनंद लुटत आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये परंपरा टिकवण्यासाठी लोककलांचे सादरीकरण होताना दिसत आहे. ज्या दिवशी देवीचा जो रंग आहे त्याच रंगाच्या साडय़ा अथवा पोशाख घालून महिलावर्ग उत्साहात सहभागी होत असल्याचे प्रकर्षांने जाणवत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi song will play in garba