उरणमध्ये महाराष्ट्र व कामगार दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला असून या दिनानिमित्ताने उरणमध्ये सीआयटीयू या कामगार संघटनेने उरणच्या बाजारपेठेतून हातात लाल बावटे व विविध मागण्यांचे फलक घेऊन कामगारांची रॅली काढली होती. त्यानंतर गांधी चौक येथे जाहीर सभा घेऊन सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी कामगारांचे हक्क मिळविण्यासाठी कामगारांना संघटित करण्याचेही आवाहन करण्यात आले.
१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन झिंदाबाद, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार कायद्यांची अमंलबजावणी करा, कामगारांना किमान वेतन द्या, कंत्राटी कामगार पद्धत बंद करा आदी घोषणा देत कामगारांनी रॅली काढली होती. रॅलीची सुरुवात उरण एसटी स्टँड चारफाटा येथून करण्यात आली. त्यानंतर पालवी रुग्णालय रस्ता, खिडकोळी नाका, गणपती चौक, स्वामी विवेकानंद चौक ते गांधी चौक अशी ही रॅली काढण्यात आली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर गांधी चौकातील जाहीर सभेत झाले.यावेळी सभेची सुरुवात कामगार गीताने करण्यात आली.
सभेसमोर जेएनपीटीचे कामगार नेते भूषण पाटील,अ‍ॅड.प्रमोद ठाकूर, सीआयटीयूचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुसुदन म्हात्रे, संजय ठाकूर, संतोष पवार, शशी यादव व संदीप पाटील यांचीही भाषणे झाली. कामगार नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत कायम कामगारांना कमी करून कंत्राटी कामगारांची संख्या सरकार वाढवत असल्याचे सांगत सरकार कामगारांच्या अधिक शोषणासाठी भांडवलदारांच्या बाजूची धोरणे घेत असल्याची टीका केली.
या विरोधात लवकर सर्व विचारांच्या कामगार संघटनांचा देशव्यापी संप करून सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचेही भूषण पाटील यांनी सांगितले.
शेकापची मोटार सायकल रॅली- महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने शेकापने उरण मध्ये मोटारसायकल रॅली काढून पाणी व वीज बचतीचे आवाहन केले. या रॅलीचे नेतृत्व माजी आमदार विवेक पाटील व शेकापचे तालुका चिटणीस महादेव घरत यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा