संक्रांतीचा सण आल्याने महिलांची बाजारात रेलचेल वाढली आहे. संक्रांतीला वाण देण्याची पद्धत आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू बाजारपेठेत विक्रीस दाखल झाल्या आहेत. त्यात १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत वस्तू उपलब्ध आहेत.
संक्रांतीचा सण हा प्रत्येक जण वेगळ्याच उत्साहात साजरा करत असतो. प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या असतात. तिळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणत असतानाच काही महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करत असतात. त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी पाच, सात, अकरा, एकवीस याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्यात येते.
वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे. अनेक घरातील महिला संक्रांतीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या महिलांना भेटवस्तू देत असतात. त्यात लहान वस्तू ज्या घरात उपयोगी येणाऱ्या किंवा महिलांच्या कामात येणाऱ्या असतात. तसेच कोणी हातरुमालाबरोबर गजरा, प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये तिळगूळ टाकून देतात. संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूमध्ये विविध प्रकार बाजारात आले आहेत. त्यात ज्वेलरी बॉक्स, छोटय़ा पर्सेस, लिपस्टिक्स, मोबाइल कव्हर या प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
संक्रांतीच्या साहित्यात वाढ
संक्रांतीसाठी लागणाऱ्या विविध आवश्यक साहित्यांनी बाजारपेठा सजल्या असून बाजरी, बाजरीचे पीठ, तीळ, तिळगूळ, तिळाच्या वडय़ा, पांढरे तीळ, गूळ यांच्या किमतीत कमी-अधिक प्रमाणात वाढ आणि घट झाली असून बाजरी २५ रु. किलो, बाजरीचे पीठ ३० रुपये किलो, साखर ३० रुपये, तीळ १२० ते १४० रुपये किलो, गूळ ५० रुपये किलो, तिळगूळ ५० रुपये किलो असा दर आहे. मागील वर्षांच्या तुलनेत साखर स्वस्त झाली आहे. त्यामुळे साखरेचे पदार्थ व गुळाचे पदार्थ बनविण्याकडे महिला वर्गाचा कल वाढू लागला आहे. साखर तिळगूळ, काटेरी तिळगूळ, खसखशी तिळगूळ, बडीशेपचे तिळगूळ, चुरमुरेचे तिळगूळ, लवंग तिळगूळ, कलिंग तिळगूळ, दालचिनी तिळगूळ, मोत्याचे तिळगूळ असे प्रकार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा