नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये आता दिवाळीचा रंग चढू लागला आहे. दिवाळी आठवडय़ावर आल्याने निरनिराळ्या रंगांच्या पणत्या, रांगोळ्या, आकाशकंदील, फटाके, सुगंधी उटणे, तयार किल्ले तसेच रोषणाईच्या माळा आणि फराळाच्या पदार्थानी बाजारपेठा सजल्या आहेत. या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे.
मातीच्या पणत्यांबरोबर चिनीमातीच्या नक्षीदार पणत्या बाजारापेठेत मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्या असून त्यांच्या खरेदीकडे लोकांचा अधिक कल आहे. एपीएमसीमध्ये मातीच्या पणत्या २५ ते ३० रुपये डझन तर चिनीमातीच्या पणत्या ४० ते ६० रुपये डझन आहेत.
विविध प्रकारचे कंदील
- बाजारात पारंपरिक आकाशकंदिलांसह चायना मेड कंदीलही उपलब्ध आहेत. मात्र पारंपरिक कंदिलांना अधिक मागणी आहे. प्लास्टिकचे साधे कंदील ५० रुपयांपासून असून चायना कंदील १५० रुपयांपासून विक्रीस आहेत. फिरकी, चांदणी, झालर आदी प्रकारांमध्ये कंदील पाहायला मिळत आहेत.
तयार किल्लेही उपलब्ध
- सध्याच्या मुलांची जीवनशैली बदलल्याने किल्ले बनविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ही बाब हेरून यंदा वेगवेगळ्या आकाराचे आकर्षक रंगसंगतीचे प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेले किल्लेही बाजारात दाखल झाले आहेत. यांची किंमत ३०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. या किल्ल्यांसह शिवाजी महाराज, मावळे, द्वारपाल, तुतारी वाजवणारे मावळे, काम करणारे मावळे, शिपाई, गवळण, वाघ, सिंह, गाय, ससे, बकऱ्या, हातगाडीवाला शेतकरी आदींचे पुतळेही विक्रीस आहेत.
रांगोळीला पर्याय
- धकाधकीच्या जीवनात रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नसल्याने रांगोळीच्या तयार नक्षीही उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी खडय़ांचा आणि मण्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रांगोळ्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. तसेच रांगोळ्या काढण्यासाठी विविध नक्षीकामाच्या गोल जाळी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यांची किंमत २० ते ४० रुपयांपर्यंत आहे.
उटणे, साबणांना मागणी
- दिवाळीनिमित्त लागणाऱ्या उटणे, साबण व अभ्यंगस्नानासाठीच्या तेलांचे बाजारात आगमन झाले असून आयुर्वेदिक अभ्यंग तेल तसेच सुवासिक साबणांची मागणी वाढली आहे. बावचा, वाळ, मुलतानी माती, गुलाब पाणी, आंबे हळद, मजिष्ठा, तुळस आदी आयुर्वेदिक वनस्पतींची भुकटी करून केलेल्या स्नानगंधा या सुगंधी तेलाला बाजारात मागणी आहे.