उरण : १९८४ साली झालेल्या उरणच्या शौर्यशाली आणि गौरवशाली आंदोलनातील हुतात्म्यांना मंगळवारी जासई हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात आले. स्थानिक भूमिपुत्रांचे योग्य पुनर्वसन आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लागणे हीच आंदोलनातील शेतकरी हुतात्मे आणि नेते माजी खासदार दि.बा. पाटील खरी आदरांजली असेल असे मत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र काम करण्याचेही आवाहन केले.
माजी खासदार दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उरणच्या शेतकरी आंदोलनाने देशातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवरील हक्क आणि त्याचा मोबदला, पुनर्वसन ठरविणारे हक्क मिळवून दिले. त्याचे लोकसभेत कायदेही करण्यात आले. तर प्रकल्पग्रस्तांचे प्रामुख्याने जेएनपीटी आणि सिडको प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंडांचे वाटपातील अडथळे दूर करून ते शेतकऱ्यांना देण्यात यावेत अशी जोरकस मागणी यावेळी करण्यात आली. तर दास्तान व नवघर येथील गोळीबारातील शेतकरी हुतात्म्यांना मंगळवारी जासई स्मारकात अभिवादन करण्यात आले.
हेही वाचा >>>लॅपटॉप लोकेशन सुविधेमुळे लॅपटॉप चोरणारे आंतरराज्य त्रिकुट जेरबंद, ८ गुन्ह्यांची उकल
१६ व १७ जानेवारी १९८४ या दिवशी उरण मध्ये शासनाच्या नवी मुंबई करीता करण्यात येत असलेल्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी दिबांच्या नेतृत्वात केलेल्या शेतकरी लढ्याचा ४० वा हुतात्मा दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मांवनदना दिली. १९८४ च्या या शेतकरी आंदोलनात १६ जानेवारीला दास्तान व १७ जानेवारी रोजी नवघर फाटा येथे झालेल्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले, त्यांचे स्मरण केले जाते.
या आंदोलनात दास्तान फाटा येथे १६ जानेवारी रोजी सिडको आणि सरकारच्या भूसंपादनाच्या विरोधात एकवटले होते. त्यांच्या वर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात नामदेव शंकर घरत(चिर्ले)व रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम) या दोन शेतकरी तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९८४ ला नवघर फाट्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवरही गोळीबार झाला. या गोळीबारात कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील (पागोटे) या पिता-पुत्रांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. जयंत पाटील, आ. बालदी, आ. ठाकूर, बाळाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, जे. एम. म्हात्रे, जेएनपीए कामगार विश्वस्त दिनेश पाटील, रवींद्र पाटील, दिबांचे पुत्र अतुल पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालय नव्या इमारतीत सुरू
नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव द्यावे’
राज्य सरकारने केंद्र सरकारला विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी मागणी या अभिवादन कार्यक्रमात करण्यात आली. त्यासाठी पुन्हा दिल्लीपर्यंत जावे लागले तरी ही मागणी मान्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
चिर्ले व धुतुम मध्ये आदरांजली
१६ जानेवारी १९८४ ला दास्तान येथील गोळीबारात चिर्ले येथील नामदेव शंकर घरत तर धुतुम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर यांनी हौतात्म्य आले. त्यांच्या गावात उभारण्यात आलेल्या अर्ध पुतळ्याला आदरांजली वाहण्यात आली.