आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : उरणच्या ओएनजीसी तेल शुद्धीकरण प्रकल्पातील मिनाज प्रकल्पाशेजारी साठलेल्या क्रुड तेलाला गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजता भीषण आग लागली. या आगीत दोन कामगार जखमी झाले. या प्रकल्पातील कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) साठय़ाला भीषण आग लागली. प्रचंड धुरामुळे संपूर्ण परिसरच झाकोळून गेला होता. नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. तासाभराने ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठय़ा शर्थीने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. दरम्यान आगीच्या घटनेमुळे भयग्रस्त झालेले नागाव, म्हातवली परिसरातील शेकडो नागरिक घराबाहेर पडले होते.

या आगीत ओएनजीसीचे दोन कामगार जखमी झाले आहेत. एक कामगार १२ टक्के तर दुसरा २० टक्के होरपळला आहे. त्यांना उरण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.

कामगारांची ५ वाजता सुट्टी झाली होती. त्यामुळे दुर्घटनास्थळी कामगारांची वर्दळ कमी होती. मात्र आग आटोक्यात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. आगीचे नेमके कारण अद्यापही कळू शकलेले नाही. ओएनजीसी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा कामगारांमध्ये आहे. याबाबत मुख्य प्रकल्प अधिकारी इंद्रजित गृहा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive fire at ongc plant uran workers injured ysh