नवी मुंबई : नवी मुंबईतील एका विवाहित महिलेवर शीळफाटा नजीक एका मंदिर परिसरात सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. मात्र तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करावे आणि सदर खटला जलदगती न्यायालयात वर्ग करावा अशी मागणी करून कोपरखैरणे ते वाशी छ. शिवाजी महाराज चौक असा सुमारे चार किलोमीटर जनआक्रोश मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात अनेक व्यक्ती तसेच स्थानिक ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबईत राहणारी महिला कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून घरातून निघून गेली ते थेट शीळ फाटा येथील एका मंदिरात. ती एकटी पाहून मंदिरातील बदली व्यक्तीने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तिला चहातून गुंगीचे औषध पाजले. तिला ग्लानी आल्यावर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह आढळून येताच वेगाने तपासाची चक्र फिरले आणि तीन आरोपींना अटक करण्यात आली.
आणखी वाचा-तिहेरी हत्याकांडाच्या चौकशीअंती डॉ. पोळ यांना अटक
सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन द्यावे अशी मागणी करीत जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला होता. कोपरखैरणे तीन टाकीपासून सकाळी साडेआकाराच्या सुमारास निघालेला जनआक्रोश मोर्चा १ च्या सुमारास छ. शिवाजी महाराज चौक वाशी येथे पोहचला. या चार किलोमीटर अंतरात अनेक जण मोर्चात सामील होत होते. शेवटी त्याचे विराट मोर्चात रूपांतर झाले होते. या मोर्चात २९ गावातील ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.