कोकणात वैद्यकीय महाविद्यालय, ट्रॉमा सेंटरचे भिजत घोंगडे
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना रविवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रायगड आणि मुंबईच्या सरकारी यंत्रणेला रातोरात पळापळ करावी लागली. रायगड ते मुंबई या सव्वाशे किलोमीटरच्या पल्ल्यावर सर्वसामान्यांसाठी एकही सरकारी ट्रामा सेंटर किंवा वैद्यकीय महाविद्यालय नसल्याची शोकांतिका या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेनंतर सरकारी यंत्रणेने मंत्र्यांसाठी दाखवलेली तत्परता सरकारने सामान्यांसाठी केली तर अनेकांचे प्राण वाचतील, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सहा वर्षांत ५०० जणांचा बळी गेला आहे. याशिवाय मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते पोलादपूर या अंतरात अपघातांमध्ये वेळीच उपचार न मिळाल्याने चार वर्षांत २५६ जण मृत्युमुखी पडले आहेत. यानंतरही सरकारला कोकणात वैद्यकीय सोयीसुविधा पुरविण्यासाठी सरकारने तत्परता दाखवलेली नाही.
मागील अनेक वर्षांत अपघातांची आणि वेळीच उपचार न मिळाल्याने प्राण जाणाऱ्यांची मालिका सुरू असताना कोकणात अजूनही एकही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय वा ट्रॉमा सेंटर उभे राहू शकले नाही. महाड येथील सावित्री नदीवरी पूल वाहून गेलेल्या दुर्घटनेनंतर पनवेल ते कोकण या टप्प्यातील चांगली आणि सुरक्षित वैद्यकीय सेवा पुरविणारी सेवा सरकार उभी करू शकलेली नाही. रावते यांच्यासाठीही सरकारला खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला हे यावरून स्पष्ट होते.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
अलिबाग येथे दोन वर्षांपूर्वी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याची घोषणा सरकारने केली होती. यामुळे येथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासोबत सरकारला ३०० ते ६०० खाटांचे सरकारी रुग्णालय उभारावे लागले असते; परंतु अलिबागमध्ये हे रुग्णालय सरकारी अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या अपुऱ्या पाठपुराव्यामुळे उभे राहू शकले नाही. अलिबाग येथे सरकारने वैद्यकीय महाविद्यालय उभारले असते तर रावते यांना रविवारी मुंबईला १०० किलोमीटर दूरवर प्रवास करून उपचारासाठी धावपळ करावी लागली नसती. ग्रामस्थांना उपचारासाठी पनवेल व मुंबई येथील रुग्णालयात जावे लागते. जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींनी सामान्यांवरील हे वैद्यकीय संकट दूर करण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज बनली आहे.
सध्या वडखळ येथे ट्रामा सेंटर उभे राहणार आहे; मात्र या सेंटरचे प्रत्यक्षात बांधकाम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. सध्या पोलादपूर ते महाड या दरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास संबंधित अपघातग्रस्तांना पुणे येथील खासगी रुग्णालयात आणि माणगाव ते पनवेल या दरम्यान अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कामोठे व पनवेलमधील खासगी रुग्णालयात आणले जाते. पनवेल येथे पाच वर्षांपासून १०० खाटांचे रुग्णालय व २० खाटांचे ट्रामा सेंटरसाठी रुग्णालयाची इमारत बांधणीचे काम सुरू आहे. उपचार मिळविण्यासाठी २०१७ उजाडेल अशी स्थिती आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उभे राहणारे ट्रामा सेंटरही मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्ट चालविणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली; मात्र त्याला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.