नवी मुंबईतील करोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या एपीएमसीमधील सर्वाची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी १७२३ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
नवी मुंबईतील एकूण करोना रुग्णांत एपीएमसी मार्केटमधील अनेकांचा समावेश असल्याचे आढळून आल्याने ११ ते १७ मे असा एक आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंद दरम्यान बाजार समितीतील सर्वाची टप्प्याटप्प्याने वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. तसेच बाजार आवारात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार आज कांदा बटाटा बाजारातील ४०३, धान्य बाजारातील १०२५ आणि मसाला बाजारातील २९५ अशा एकूण १७२३ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात कांदा बटाटा बाजारातील ५ व मसाला बाजारातील एक संशयित रुग्ण असून त्यातील ५ जणांची करोना चाचणी करण्यात आली.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य पथकाने एपीएमसीला भेट देऊन कांदा बटाटा बाजारात पाहणी केली आणि त्या ठिकाणी सुरू असलेल्या वैद्यकीय तपासणीचा तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.