ठाणे: नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे अस्वस्थ असलेल्या शहरातील हॉटेल मालकांनी मंगळवारी रात्री उशिरा ठाण्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याकडून या कारवाईतून अभय मिळावे यासाठी साकडे घातले. ठाणे शहराच्या माजी महापौर राहिलेल्या एका महिला नेत्याने या हाॅटेल मालकांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दरम्यान या भेटीनंतरही मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही ठोस आश्वासन या मंडळींना मिळाले नाही, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी लोकसत्ताला दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांत बेसुमार पद्धतीने अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. गावठाणे, सिडको वसाहती तसेच एमआयडीसी पट्ट्यात डोंगरांच्या पायथ्याशी मन मानेल त्या पद्धतीने बांधकामांची उभारणी सुरू असून अतिक्रमण नियंत्रण पथकाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.या विभागाचा कारभार गेली अनेक वर्षे अमरिश पटनिगिरे यांच्याकडे होता. त्यांच्या काळात बेकायदा बांधकामांना आळा घालण्यात महापालिकेस अपयश आले. याच काळात दुकानांसमोरील मार्जिनल स्पेस बळकावून व्यवसाय सुरू करण्याचे पेवही फुटले. बेलापूर सेक्टर १५ तसेच आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षांत उभ्या राहिलेल्या सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हाॅटेलांच्या रांगा उभ्या राहिल्या आहेत. पब, डिस्को थेक तसेच उंची हॅाटेलांच्या समोरील जागांमध्येही बैठक व्यवस्था तसेच मद्यपुरवठा केला जातो.

हेही वाचा… मंदा म्हात्रेंच्या संरक्षणात अचानक वाढ; राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क

महापालिकेने येथील वाढीव बांधकामांकडे इतक्या वर्षात ढुंकूनही पाहिले नव्हते. शहराच्या जवळपास सर्वच उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांत हाॅटेल चालकांकडून केल्या जाणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई झालेली नाही. पटनिगिरे हे निवृत्त होताच गेल्या काही महिन्यांपासून या कारवाईला बळ आले असून बेलापूर सेक्टर १५ येथील हाॅटेलांमधील वाढीव बांधकामे तसेच मार्जिनल स्पेसमध्ये टाकण्यात आलेल्या शेडवर अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई करण्यात आली.

नाराज हाॅटेल मालकांच्या ठाण्यात फेऱ्या

बेलापूर येथील हाॅटेलांवरील झालेल्या कारवाईपाठोपाठ संपूर्ण नवी मुंबईतील हाॅटेल मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामांचे महापालिकेने नव्याने सर्वेक्षण सुरू केले असून त्यानुसार पुढील काही दिवसांत कारवाईची आखणी करण्यात येणार आहे.वाशी सेक्टर १७ तसेच याच भागातील एका मोठ्या व्यापारी संकुलातील हाॅटेलांमधील वाढीव बांधकामांची यादी तयार करण्यात आली असून यापैकी कोणत्या आस्थापनांना यापूर्वी नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत शिवाय कोणत्या ठिकाणी न्यायालयीन स्थगिती आहे याचाही अभ्यास केला जात आहे.

दरम्यान, या कारवाईची कुणकुण लागलेल्या नवी मुंबईतील हाॅटेल मालकांच्या एका मोठ्या गटाने मंगळवारी रात्री ठाण्यातील टीपटॅाप प्लाझा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सायंकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी ही मंडळी ठाण मांडून होती. रात्री उशिरा एका पक्षीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते. हा कार्यक्रम आटोपताच ठाण्यातील एका महिला माजी महापौराच्या पुढाकाराने ही भेट घडवून आणली. ही कारवाई थांबावी असे साकडेही यावेळी मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले.दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून या मंडळींना कोणतेही ठोस आश्वासन दिले गेले नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

शहरातील हाॅटेल मालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली किंवा कसे यासंबंधी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. कोणतेही निर्देशही आम्हाला मिळालेले नाहीत. – डाॅ. राहुल गेठे, उपायुक्त

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting with cm eknath shinde to protect hotel owners in navi mumbai from encroachment control department action dvr