नवी मुंबई ः ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतील २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेच्या अर्जनोंदणीला सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ८८ हजाराहून अधिक इच्छुकांनी या योजनेसाठी अर्जनोंदणी केली आहे. महिनाभराची मुदतवाढ अर्ज नोंदणीसाठी मिळाल्याने या योजनेसाठी अर्ज करणा-यांची संख्या सव्वालाखांपर्यंत पोहचेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दस-याच्या दिवशी वाशी, खारघर, मानसरोवर रेल्वेस्थानक, खांदेश्वर रेल्वेस्थानक आणि तळोजा या परिसरातील २६ हजार घरांसाठी सिडको मंडळाने सोडत प्रक्रियेला सूरुवात केली. सोडत प्रक्रिया सूरु झाल्यावर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाली. या योजनेत पहिल्यांदी सिडको मंडळाने सोडत प्रक्रियेसोबत इच्छुक अर्जदारांनी त्यांची पात्रतेची कागदपत्र जोडण्याची अट ठेवल्यामुळे ही सर्व कागदपत्र मिळविण्यासाठी इच्छुकांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी अर्जदारांकडून मुदवाढीची मागणी केली जात होती. अखेर सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नागरिकांकडून होणा-या मागणीचा विचार करुन ११ डिसेंबरपर्यंत या योजनेतील सोडत प्रक्रियेसाठी अर्जनोंदणीला मुदतवाढ दिली. ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ असे या योजनेचे नाव असून योजनेच्या पहिल्याच दिवशी १२ हजार ४०० अर्जदारांनी त्यांची नोंदणी केल्याने या योजनेला उंदड प्रतिसाद मिळेल असे बोलले जात होते. मात्र सिडको मंडळाने घरांच्या किंमती गुलदस्त्यात ठेवल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला. पुढील वर्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून मालवाहू वाहतूक सूरु करण्यासाठी सिडको मंडळाच्या जोरदार हालचाली सूरु असल्याने सिडकोच्या २६ हजार घरांच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळेल अशी चर्चा आहे.   

हे ही वाचा… उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी

हे ही वाचा… शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) या उत्पन्न गटातील नागरिक या योजनेसाठी अर्ज भरु शकतील. ६ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणारे सर्वच नागरीक एलआयजी श्रेणीत या योजनेत अर्ज करत असल्याने वर्षाला २० ते ३० लाख रुपये उत्पन्न असणा-या नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत. तळोजा परिसरात प्रदूषणाचा त्रास जास्त असला तरी या परिसरातील १३ हजार घरांचा समावेश या सोडत प्रक्रियेत करण्यात आला आहे. या योजनेत घरासाठी इच्छुक नागरीक सिडको मंडळाच्या https:\.cidcohomes.com  संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी भेट देऊ शकतील असे आवाहन सिडको मंडळाने केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega housing lottery application process for 26000 homes extended by one month by cidco asj